गोंदिया : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना नवेगावबांध – कोहमारा मार्गावरील खोबा गावाजवळ बुधवार, 29 जानेवारीच्या सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.
गोंदिया जिल्ह्यातील संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. वनातील वन्यप्राणीही महामार्गाचा वापर करत रस्ता ओलांडतात. परंतु, रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत प्राण्यांना आपले जीव गमवावे लागते. अलीकडच्या काळात वन्य प्राण्यांची संख्या वाढल्यामुळे ते विचरणसाठी इतर भागात स्थलांतर करतात. दरम्यान, रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत वन्य प्राण्यांचा मृत्यू होत आहे. बुधवार, 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान असाच प्रकार उघडकीस आला. नवेगावबांध ते कोहमारा मार्गावरील खोबा गावाजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठला आणि बिबट्याचा मृतदेह डोंगरगाव डेपोमध्ये आणला. गुरुवारी सकाळी पंचनामा करून त्याचे पोस्टमार्टम केले जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील संरक्षित वनक्षेत्राजवळील रस्त्यांवर होणाऱ्या या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.





