गोंदिया : घरगुती गॅसची गळती झाल्याने सिलींडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील जीवनोपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली. ही घटना बुधवार 29 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास शहराजवळील खमारी येथे घडली. सुदैवाने घटनेत जीवतहानी झाली नसून घरमालकाचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी बुधवारी सकाळच्या सुमारास अचानक सिलींडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण घराला आग लागली. सुदैवाने कुणीही घरात नसल्याने जीवित हानी झाली नाही. दरम्यान, शेजारच्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. घटनेची माहिती गोंदिया नगरपरिषदेच्या अग्नीशामक विभागाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाख्ल होत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत घारातील अन्नधान्यासह इतर जीवनोपयोगी साहित्य भस्मसात झाले होते. घटनेत उके यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तलाठी यांनी पंचानामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. शासनाने तत्काळ उके यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.





