गोंदिया : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणार्या सौंदड सहवनक्षेत्रातील गिरोला-हेटी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना शनिवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. बिबट्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत बिबट चार ते पाच वर्षांचा मादी असल्याचे पाहणी समोर आले.
गिरोला-हेटी गावाजवळील बसस्थानकापासून दहा मीटर अंतरावर बिबट मृतावस्थेत होता. याची माहिती काही गावकर्यांनी सडक अर्जुनी वनविभागाच्या अधिकार्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचार्यांनी घटनास्थळाची तपासणी व मृत बिबट्याची पाहणी केली असता, सर्व अवयव साबूत असल्याचे दिसले. त्यामुळे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, सौंदड येथील पशुवैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर अग्निसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा विसेरा तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन तरोणे, सहवनक्षेत्र अधिकारी युवराज राठोड, वनरक्षक उंदिरवाडे करीत आहेत.





