गोंदिया : वन्यप्राणी गणना निसर्गानुभव-२०२५ चा अहवाल आला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची मोजदाद करण्यासाठी १२ मे रोजी प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ८८६ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. तर दुसर्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद घेण्यात आली आहे. त्यातच १० वाघ आणि २४ बिबट देखील आढळून आले, गणनेत एकूण २३०२ वन्यजीवांची नोंद झाली. या आकडेवारीवरून मात्र नवेगाव-नागझिरा हे जरी व्याघ्र प्रकल्प असले तरी ते रानगव्यांनीच ‘कॅप्चर’ केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गोंदिया आणि भंडारा जिल्हे वनवैभवाने आणि जैवविविधतेने नटलेले आहेत. या भागावर निसर्गाने जणू मुक्त हस्ताने उघळणच केली आहे. येथील प्राणी, पक्षी आणि वनवैभव देशाच्या कानाकोपर्यात पोहोचाव्यात या उद्देशाने नवेगावबांध येथे राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्यात आले. तर नागझिराचे जंगल १८७८-८९ मध्ये संरक्षित जंगल म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात विविध प्राणी, पक्षी आणि जैवविविधता असल्यामुळे या जंगलाला १९७० साली प्रकल्प घोषीत करण्यात आले. यादरम्यान हे जंगल वाघासाठी प्रसिद्ध झाले. पर्यटकांचा ओढा देखील वाढला. येथील वाघांची माहिती जगाच्या नकाशावर पोहोचविण्याच्या उद्देशाने न्यू नागझिरा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य मिळून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प म्हणून नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला. वन्यप्राण्यांसाठी राखीव करण्यात आलेल्या जंगलांमध्ये कोणत्या प्राण्याची किती संख्या आहे याची मोजणी करण्यासाठी दरवर्षी वन्यप्राणी गणना केली जाते. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही वन्यप्राणी गणना केली जाते. दरवर्षाप्रमाणे यंदा बुद्ध पौर्णिमेला सोमवार, १२ मे रोजी वन्यप्राणी गणना करण्यात आली. यामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर हा वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम घेण्यात आला होता. या वन्यप्राणी गणनेत सहभागी झालेल्या स्वयंसेवक व वन कर्मचार्यांकडून त्यांना दिसणार्या वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. त्यानुसार, घेण्यात आलेल्या नोंदींचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक संख्या रानगव्यांची दिसत आहे. कारण, अहवालात सर्वाधिक ८८६ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर २५५ रानडुकरांची, तिसर्या क्रमांकावर १६८ ठिपके असलेल्या हरणांची तर चवथ्या क्रमांकावर ४५९ वानरांची नोंद घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे १० वाघांचे दर्शन देखील निरीक्षकांनी नोंदविले असून २४ बिबट देखील आढळले. तसेच ६३ रानटी कुत्रे, १३ चौसिंगे, १ जंगली मांजर, १ ससा, ९ मुंगूस, १२० मोर, ६१ लाल आणि पांढर्या तोंडाचे मांजर, ४२ सांबर अशा एकूण २३०२ विविध प्रजातींच्या वन्यजीवांची गणना करण्यात आली.
गोंदियात ७० टक्के प्रकल्प….
आजघडीला या प्रकल्पात अधिकारी आणि कर्मचार्यांची बहुतांश पदे भरण्यात आली. हा प्रकल्प ३० टक्के भंडारा, तर ७० टक्के गोंदिया जिल्ह्यात येतो. नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील वनवैभव, वन्यप्राणी न्याहाळण्याकरिता तब्बल ९ प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. वन्यजीव विभाग या प्रकल्पातील पर्यटकांची संख्या वाढावी, या उद्देशाने विविध पद्धतींचा अवलंब करत आहे.
८० मचाणांवरून गणना….
वन्यप्राणी गणनेसाठी नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात ६८ मचाणांवरून १३६ वन्यप्रेमी, वन्यजीव विभागाच्या २४ अधिकारी आणि कर्मचान्यांनी वन्यजीव गणना केली. अशा एकूण ४० मचाणांवरून चंद्राच्या लख्ख प्रकाशात ८० मचाणांवरून १६० जणांनी २३०२ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. वन्यप्राणी गणनेमुळे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.





