२१ जून ला ११ वे आंतरराष्ट्रीय योग दिन
गोंदिया : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथम एम. यांनी केले आहे.
शनिवार २१ जुन २०२५ रोजीच्या ११ वे आंतरराष्ट्रीय योग साजरा करण्यात येत आहे. योग दिनाचे एक दशक पूर्ण होत असून त्या निमित्ताने संपूर्ण देशात १० विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने योग संगम मध्ये २१ जून रोजी सकाळी ६:३० ते ७:४५ दरम्यान मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे. विशेष म्हणजे मा. पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार आहे. योग संगम हे व्यापक जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुषमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्यानेही आयोजित करावयाचा आहे. यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी शासनाने दिलेला क्यूआर कोड १ स्कॅन करून योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती तर क्यूआर कोड २ स्कॅन करून इतर संदर्भ सामग्री मिळवता येईल. हरित योग अंतर्गत हरित योग उपक्रम, पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांना या उपक्रमांना हरित योग अंतर्गत योग दिनाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे राबविता येणार आहे. योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ साहित्यासाठी शासनाने दिलेला क्यूआर कोड ३ स्कॅन करून प्राप्त करता येणार असल्याचे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित पाणी, स्वच्छता व आरोग्य संबधातील दृष्टिकोन समाविष्ट करावे, जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल. दरम्यान सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी ‘योग फॉर वेल बिइंग अँड वॉश’ या संमेलनाचे आयोजन करावे. हे आयोजन करतांना जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-२ ची कामे असलेल्या ठीकाणांची निवड करावी. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा २ संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा २ मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे, समुदाय, योग क्रिया व योजनांची मालमत्ता दर्शविणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे. दरम्यान सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन व कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सदर कार्यक्रमांची जिल्ह्याच्या सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन असे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन फरेन्द्र कुतीरकर यांनी केले आहे.



