गोंदिया : शहरातील डब्लिंग कॉलनीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 24 तासाच्या आत अटक करण्यास यश आले. ही कारवाई 19 ऑगस्ट रोजी करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 82 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गणेश राहुल नागदेवे (वय 22 वर्ष, रा. डब्लींग कॉलोनी, सिव्हील लाईन गोंदिया, ह.मु. शिव दुध डेयरी जवळ, गांधी वार्ड, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, डब्लिंग कॉलनी येथील 43 वर्षीय तक्रारदार सविता विष्णू पटेल, गोंदिया यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार दिली कि १७/०८/२०२५ चे दुपारी २ ते ४ वाजता दरम्यान घरी कोणीही नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे डब्लिंग कॉलनी येथील रेल्वे क्वार्टर मधील स्वयंपाक खोलीतील वरील सिमेंट सीट तोडून घरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे १९/०८/२०२५ रोजी अपराध क्र. ६८३/२०२५ कलम ३०५, ३३१(३) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना १९ ऑगस्ट २०२५ रोजी पथकास गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की, फिर्यादी सविता विष्णु पटेल यांचे राहते घरातुन गणेश राहुल नागदेवे (वय 22 वर्ष रा. डब्लींग कॉलोनी, सिव्हील लाईन गोंदिया) याने सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये चोरी करुन नेलेले आहे. अशी गोपनीय माहीती प्राप्त होताच गणेश राहुल नागदेवे यास पोलिस स्टाफच्या मदतीने गांधी वार्ड, गोंदिया येथुन ताब्यात घेतले. विचारपुस केले असता त्याने सांगीतले की, त्याने 17/08/2025 रोजी दुपारी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास रेल्वे क्वार्टर डब्लिंग कॉलनी येथे घराचे वरिल सिमेन्ट पत-याला काढुन घराचे आत प्रवेश करुन लोखंडी आलमारीतुन सोन्याचे दागीने व नगदी चोरी करुन दागिने स्वतःच्या राहत्या घरी लपवुन ठेवले आहे. असा सांगीतल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष त्याचे राहते घरातुन गुन्हयात चोरीस गेलेला चैन, पदक, कानाची बिरी चैनसह, आंगठी, नोजल रिंग, नाकचे खडे, पायल असा एकूण 1 लाख 82 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला. सदर आरोपी यास पुढील कारवाही करिता पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे सुपूर्द करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई…
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया अभय डोंगरे यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक सपोनि धीरज राजूरकर , पोउपनि. शरद सैदाने, अंमलदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, सुबोध बिसेन, संजय चौहान, इंद्रजित बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, राकेश इंदूरकर, छगन विठ्ठले यांनी कारवाई केली.





