Wednesday, January 21, 2026
spot_img

चुभली नदीवरील पूल खचला!; सुदैवाने मोठी हानी टळली

नवीन पुल बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी
देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील मगरडोह ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या घोघरा-चुभली गावांना जोडणारा ३० वर्षे जुना असलेला चुभली नदीवरील पूल जीर्ण झाला असून शनिवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सदर पुल खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी पुल जीर्ण झाला असल्याने पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा या जीर्ण धोकादायक पूलाची तात्पुरती दुरुस्ती करून त्वरित नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांनी केली आहे.
मगरडोह हे गाव अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गाव असून मगरडोह ग्राम पंचायत अंतर्गत घोगरा व चुभली ही दोन महसूली गावे आहेत. दरम्यान दोन्ही गावांच्या मध्यभागी चुभली नदी असून या नदीवरील पुलावरून येथील गावकरी, शेतकर्‍यांना ये-जा करण्याकरिता मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या पुलावरून शेतकरी, नागरीक तसेच विद्यार्थ्यांची नेहमीच रेलचेल असते. विशेषतः परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील पिकांसह औजारे आदींची ने-आण करण्याकरिता याच पुलाचा अवलंब करतात. मात्र, गेली ३० वर्षे, पुलाच्या निर्मितीपासून शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यातच दरवर्षी पावसाळ्यात हा पुल नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली येत असल्याने जीर्ण झालेला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास अचानकच पुलाच्या एका बाजूने खचल्याचे उघडकीस आले. चुभली नदीवरील पूल धोकादायक झालेला असून पुलावरून प्रवास करताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, सदर पुल पुर्णतः खचून बंद पडल्यास परिसरातील शेतकऱ्यांपुढे वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.

केवळ आश्वासन…
प्रत्येक पावसाळ्यात पुलावरून पूर वाहत असतो. त्यामुळे मगरडोह, घोगरा मार्ग बंद राहते. परिणामी घोगरा, चुभली गावातील नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो. अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला सदर बाब निदर्शनात आणून दिलेली असली तरीही फक्त परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासनावरच राहावे लागते.

पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे…
पूल खचल्याची माहिती मिळताच, मगरडोहचे उपसरपंच देवविलास भोगारे यांच्यसह मुनेश्वर कोसमे, पुणेश भोयर, लोकेश उईके व इतर गावकर्‍यांनी घटनास्थळ गाठून तुटलेल्या पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. त्यामुळे संबधित विभाग व स्थानिक जनप्रतिनिधी याकडे लक्ष देत त्वरित नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular