Tuesday, March 10, 2026
spot_img

‘रेशीम विभाग आपल्या दारी’ अभियान; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

गोंदिया : शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाच्या प्रवाहात जोडण्याकरीता जिल्ह्यात “रेशीम विभाग आपल्या दारी” मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी जावून भेट देणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन श्रेणी-2 रेशीम विकास अधिकारी सी.आर. वासनिक यांनी केले आहे.
परंपरागत शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण अशा रेशीम उत्पादनासाठी किमान एक एकर शेतीमध्ये तुती लागवड करून आपली उत्पादन क्षमता वाढवावी या हेतूने रेशीम संचालनालय नागपूर राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन व सहाय्य करते. सन 2025 मधील “हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र” या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमानुसार रेशीम विभागाला 4 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. ज्या जिल्ह्यात योग्य पाऊस झालेला आहे अश्या जिल्ह्यात तुती लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तथापि पावसाला विलंब झालेल्या जिल्ह्यात आणि जन-जागृतीच्या अभावी काही जिल्ह्यात अद्यापही लागवडी झालेल्या नाहीत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये तुतीची झाडे लावून कोषाचे उत्पादन करून भरघोस नफा मिळवावा या हेतुने राज्याचे रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मून यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य “रेशीम दिन” दिनांक 1 सप्टेंबर पासून राज्यात “रेशीम विभाग आपल्या दारी” मोहीम राबविण्यात येत आहे. मागील दोन वर्षात तथा या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी 500 रुपये देऊन रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या दारी भेटी देऊन त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना रेशीम उद्योगाकडे वळावे व योजनांचा लाभ घ्यावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
रेशीम शेती करण्यासाठी प्रामुख्याने शासनाच्या दोन योजना आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळावा म्हणून मनरेगा अंतर्गत तीन वर्षात 4 लाख 32 हजार 240 रुपयाचे कार्य मूल्यमापन करून रक्कम दिली जाते. प्रगतशील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत सिल्क समग्र-2 ही योजना असून यात दोन एकर तुती लागवडीसाठी 90 हजार रुपये, किटक संगोपन गृह बांधकाम करण्याकरीता 2 लाख 37 हजार 500 रुपये, किटक संगोपन साहित्य खरेदीकरीता 56 हजार 250 रुपये, ठिबक सिंचन संचाकरीता 75 हजार रुपये व निर्जंतुकीकरण साहित्याकरीता 3 हजार 750 रुपये असे एकूण 4 लाख 62 हजार 500 रुपये इतके रुपयाची योजना आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये सन 2023-24, 2024-25, 2025-26 या वर्षात 168 शेतकऱ्यांनी तुती लागवडीकरीता नोंदणी केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात नोंदणी केल्यापैकी 56 शेतकऱ्यांनी तुती लागवड करून शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाच्या प्रवाहात जोडण्याकरीता जिल्ह्यात “रेशीम विभाग आपल्या दारी” मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी जावून भेट देणार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय अर्जुनी/मोरगाव तर्फे करण्यात येत आहे. तेव्हा आपल्या गावात येत असलेल्या रेशीम कर्मचाऱ्यांशी भेटी दरम्यान प्रत्यक्ष संपर्क करावा.
जे शेतकरी नव्याने रेशीम शेती करण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या गावी किमान पाच ते दहा शेतकऱ्यांची बैठक ठेवून रेशीम कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. संपर्कासाठी 07196-220728 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सी.आर.वासनिक, रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2, जिल्हा रेशीम कार्यालय अर्जुनी मोरगाव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular