अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथील घटना; नागरिकांचा प्रशासनावर आक्रोश
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय नजीकच्या संजयनगर (बंगाली कॅम्प) येथे आज (ता. २५) पहाटे ५ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या घरी लघुशंकेला गेलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट वाघाने हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव वंश प्रकाश मंडल (वय ५) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, वंश मंडल हा आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास झोपेतून उठून अंगणात लघुशकेला गेला. दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. जवळ असलेल्या आजीने आरडा ओरड केली असता परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ केली. बिबट्याने जंगल परिसरात नेऊन त्याच्या मानेवर वार केला. दरम्यान बरीच आरडा ओरड झाल्याने वाघ चिमुकल्या वंशला जागेवरच टाकून पसार झाला. लगेच गावकऱ्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी वंशला मृत घोषित केले.
हिंस्त्रप्राणी बिबट्याने दिवसेंदिवस घरात येऊन गाई वासरे शेळ्या कोंबड्या खाल्या. यासाठी अनेक पशुपालकांनी वनविभागाकडे मदतीची मागणी केली. मात्र, वन विभागाने असमर्थता दर्शवली. वन्यप्राणी बिबट्या चिमुकल्या मुलांना टाॅरगेट करत आहेत. अशा घटना होऊ नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वनविभागाकडे दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते. तो चिमुकला आपल्या आजी सोबत घरी होता. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत वनविभागाने देवून त्या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा मागणी करूनही वन विभागाकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. यापूर्वी गोठणगाव येथील प्रदीप साखरे यांचा मुलगा व त्यानंतर युक्ता चंद्रशेखर निखारे हिला ३० मे रोजी अंगणातून तर तिसऱ्यावेळी इटियाडोह धरण बघायला आलेल्या चार वर्षीय विहान रॉय रा. दिनकरनगर या चिमुकल्या पर्यटकांवर ३० ऑगस्ट रोजी हल्ला करत उचलून नेवून गंभीर जखमी केले. आता चौथ्यांदा या घटनेत अंश प्रकाश मंडल याचा थेट जीवच घेतला. यामुळे नागरिकात वन विभागा विषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच्या बंदोबस्त करा. अन्यथा वन विभागाचा एकही कर्मचारी गावात परिसरात मोकळा फिरू देणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.





