Sunday, January 18, 2026
spot_img

संघाचे शताब्दी वर्ष साधना, सेवा व समर्पणाचे प्रतिक : भारत भूषण

गोंदिया नगर संघशाखेचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव
गोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष हा केवळ एक उत्सव नसून ते साधना, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आम्ही शताब्दी साजरी करण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्य पूर्ण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तन, मन आणि धनाने समर्पित होऊन भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानी पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. संघशाखा ही व्यक्तीनिर्माणाची प्रयोगशाळा आहे, येथे शाखेत येणारा स्वयंसेवक होतो व राष्ट्रसेवेचा संकल्प घेतो, असे मत संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण अरोडा यांनी मांडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोंदिया नगराचा विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सव १२ ऑक्टोबर रोजी येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून स्टाफ क्लाउड प्रा. लि.चे संस्थापक शैलेश अग्रवाल होते. मंचावर विभाग संघचालक दलजितसिंग खालसा, नगर संघचालक मिलिंद अलोणी उपस्थित होते. भारत भूषण पुढे म्हणाले, डॉ. हेडगेवार यांनी लहान बालकांना एकत्रित करून त्यांना व्यायाम, खेळ आणि राष्ट्रीय चिंतनाच्या माध्यमातून संस्कारीत केले. या स्वयंसेवकांनी समाजाला संघटीत केले. याच समाजाच्या संघटनशक्तीचे परिणाम म्हणजे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण झाले. त्यांनी सांगितले की, तुमच्याकडे वेळ आहे, तर आमच्याकडे काम आहे. तुमच्याकडे काम आहे तर आमच्याकडे स्वयंसेवक आहेत. संघाचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे साधन आहे. अभाविप, विज्ञान भारती, मजूर संघ, किसान संघ अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून संघ काम करीत आहे. आजघडीला ८३ हजार दैनंदिन शाखा, ३२ हजार साप्ताहिक शाखा व मासिक शाखेतून संघ कार्य सुरू आहे.
राष्ट्रनिर्माणासाठी पाच प्रमुख सूत्रे त्यांनी सांगितली. यात भेदभाव मिटवून समरसता निर्माण करणे, पर्यावरण वाचविणे, कुटुंब प्रबोधन, स्वदेशीचा स्विकार आणि नागरिक कतव्यांचे पालन करणे असे आहे. त्यांनी स्पष्ट केले की मंदिर, स्मशान किंवा विहीर यांसारख्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव नसावा. पृथ्वी वाचवणे आपली जबाबदारी आहे. जितका उपभोग कमी कराल, तितक्या पुढील पिढ्या सुरक्षित राहतील, असे ते म्हणाले. कुटुंबात संवाद आणि संस्काराची परंपरा पुन्हा जागृत करण्यासाठी त्यांनी डिस्कनेक्ट टू कनेक्ट चा मंत्र दिला आणि मोबाईलपासून काही काळ दूर राहून कुटुंबासोबत जोडले जाण्याचे आवाहन केले. स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देताना ते म्हणाले की, परदेशी झगमगाट सोडून भारतीय उत्पादने स्वीकारणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे. मातृभाषा, भारतीय खानपान आणि परंपरा ही आपली अस्मिता असून, भाषा, भजन आणि भ्रमण यांद्वारे भारताला जोडणे हीच खरी संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शैलेश अग्रवाल यांनी लोकशाही सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असून भारताची लोकसंख्या ही आपली कमजोरी नसून योग्य व्यवस्थापनाने ती आपली सर्वात मोठी ताकद ठरू शकते. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून भारताला ज्ञान-समृद्ध करण्याचे आवाहन करून समाज सुधारणेतील स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजनाने झाली. दरम्यान स्वयंसेवकांनी आसन, दंड, योग आदी प्रात्याक्षिक सादर केले. नगर कार्यवाह शरद काथरानी यांनी प्रस्तावनेत सांगितले, संघ शताब्दी वर्षात विजयादशमी उत्सव, गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, सद्भावना बैठक, युवा संमेलन व अधिकाधिक शाखा सप्ताह आयोजित केले जात आहे. गोंदिया नगरात २४ वस्तींमध्ये १६ दैनिक शाखा व ९ साप्ताहिक शाखा सक्रीय आहे. संचालन व आभार प्रदर्शन काथरानी यांनी केले. यावेळी गणमान्य नागरिक, मातृशक्ती, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

पथसंचलनात दिसली राष्ट्रभावना…

कार्यक्रमापूर्वी, स्वयंसेवकांनी संघाच्या पूर्ण गणवेशात शहराच्या प्रमुख मार्गांवरून अनुशासित पथसंचलन काढले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्धतेने चालत एकता आणि प्रखर राष्ट्रभावनेचे प्रभावी प्रदर्शन केले. यादरम्यान पथसंचनातील स्वयंसेवकांवर अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवर्षाव करून आपली राष्ट्रभावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular