समस्यांचे निराकरणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन
गोंदिया : आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभुमीवर एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्याच्या अनुषंगाने तसेच लाभार्थ्यांना गॅसचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दि.13 एप्रिल 2026 रोजी कंपनीचे विक्री अधिकारी व गॅस ऐजन्सीधारक यांची सभा घेण्यात आली. गॅसचा पुरवठा मागणीप्रमाणे समाधानकारक असल्याचे विक्री अधिकारी व गॅस ऐजन्सीधारक यांनी कळविले आहे.
जिल्हयात आजरोजी पर्यंत मागणीनुसार पुरेशा प्रमाणात एलपीजी (LPG) साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी बुकींग करण्यासाठी अवास्तव घाबरु (Panic Booking) नये. तसेच गॅस सिलेंडरकरीता गॅस ऐजन्सीबाहेर किंवा गोदामात गर्दी करु नये. गॅस डीलीवरी घरपोच करण्यात येत असून गॅस सिलेंडर प्राप्त झाल्यानंतरच घरपोच पुरवठादार (Delivery Boy) ला ओटीपी (OTP) दयावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विना ओटीपी (OTP) गॅस सिलेंडर डीलीवर (deliver) झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर प्रशासनाकडून कडक कार्यवाही केली जाईल. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच जिल्हयात केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे, ज्यामुळे नागरिकांच्या गरजेचे काही प्रमाणात निवारण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बुकींगसाठी अवास्तव न घाबरता (Panic Booking) गॅस ऐजन्सीबाहेरील व गोदामातील गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 8329047775 असा आहे. नागरिक यावर आपल्या तक्रारी/समस्या नोंदवू शकतात.





