गोंदिया : अंध खेळाडूंसाठी चौथी राष्ट्रीय गोलबाल स्पर्धा गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकूलात २६ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा २६ ते २८ डिसेंबरपर्यत चालणार आहे. या स्पर्धेत देशातील एकूण ३५० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती सोमवार, २३ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी माहिती देताना ब्लॉइंड स्पोर्टस् असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव आरती लिमजे, जिल्हाध्यक्ष राजकुमार कुथे, सोशल मिडीया प्रभारी मुंबई सुवर्णा जोशी, समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय नाईक, ओमप्रकाश गुप्ता, सहसचिव डॉ. महेंद्र हेमणे आदि उपस्थित होते. चार दिवसीय स्पर्धेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, देशात सन २०१६ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. पहिली राष्ट्रीय स्पर्धा ही २०१६ मध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे घेण्यात आली. दुसरी हरियाणाच्या रोहतक येथे तर तिसरी स्पर्धा उत्तरप्रदेश राज्यातील सहारनपुर येथे झाली होती. या स्पर्धेच्या आयोजनाचे सौभाग्य महाराष्ट्रातील गोंदियाला मिळाले ही आनंदाची बाब आहे. गोंदिया येथेही या स्पर्र्धेत सहभाग घेणारी राष्ट्रीय खेळाडू सुरूची गुप्ता आहे. या स्पर्धेची सुरूवात दुसर्या विश्वयुध्दात अनेक खेळाडू अंध झाले असताना १९४६ मध्ये झाली. सन १९७६ मध्ये परॉलम्पिक खेळांमध्ये या स्पर्धेचा समावेश करण्यात आला. त्यांच्यासाठी विशेषत्वाने ही स्पर्धा तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहा खेळाडू सहभागी होतात. त्यात तीन परफॉर्म करतात. २४ मिनिटाची स्पर्धा असते. लाकडी कोर्टात होणार्या स्पर्धेत घुंगरूच्या ध्वनीवर हा खेळ खेळला जातो. १२० देशात ही स्पर्धा खेळविण्यात येते. थायलंड येथे २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा खेळाडू सहभागी झाले होते. गोंदियामध्ये आयोजित स्पर्धेतून महाराष्ट्रातील सहा मुले व सहा मुलींची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आरती लिमजे ह्या पहिल्या महिला खेळाडू असून सन २०१८ मध्ये थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून त्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत विशेषत: झारखंडचे पहिले अंध आयएएस राजेश सिंह हे गोंदिया येथे येणार आहेत. सोबत पहिले अंध अर्जुन अवॉर्ड प्राप्त खेळाडू रामकरण सिंह येणार आहे. २६ डिसेंबर रोजी स्पर्धेचा उद्घाटन आ.विनोद अग्रवाल, आ.सुधाकर आडबाले यांच्या हस्ते पार पडणार असून २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरणासह समापन समारंभ होणार आहे. क्रीडा प्रेमींनी स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येत उपस्थिती दर्शवून खेळाडूंचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चौथी राष्ट्रीय अंध गोलबाल स्पर्धा २६ पासून; गोंदियात आयोजन
देशातील ३५० खेळाडू सहभाग घेणार



