Tuesday, May 26, 2026

बळीप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजा महोत्सव उत्साहात

गोंदिया : दरवर्षी शहरातील सर्व सकल ओबीसी व बहुजन संघटनेच्यावतीने आज (दि.२२) ‘बळीराजा महोत्सव’ बलिप्रतिपदेच्या निमित्ताने येथील जयस्तंभ चौकातील ओबीसी संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा व्हावा. यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवर्तनवादी विचारकांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे शिशिर कटरे, एस.यु. वंजारी, प्रसिध्दी प्रमुख सावन डोये, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, सामाजिक कार्यकर्ते भुपेंद्र वैद्य, बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेम साठवणे, देवचंद खोब्रागडे, श्री. चौरागडे, दुर्गेश येल्ले,बीक्रिश साठवणे, प्राची साठवणे यांच्यासह ओबीसी बहुजन संंघटनाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण. भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी, दानशूर, सद्गुणी म्हणून विख्यात आहे. बळीचे राज्य अर्थात समतेचे, न्यायाचे राज्य. बळीचे राज्य म्हणजे स्त्रीपुरुष विषमता, जातीभेद, वर्णभेद रहित राज्य. अशा महादानशूर, संविभागी बळीराजाची आठवण दिवाळीला- बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस, शेतकरी आयाबहिणी इडापीडा जावो। बळीचे राज्य येवो।। असे म्हणत सण साजरा केला जात असल्याची माहिती उपस्थित पाहुण्यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular