गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोठणगावजवळ वसलेल्या नॉर्ग्येलिंग तिबेटीयन सेटलमेंटचे सेटलमेंट ऑफिसर तेनझिन त्सांगपा यांनी 3 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मंदार पत्की (भा.प्र.से.) यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान सेटलमेंट ऑफिसर यांनी नॉर्ग्येलिंग तिबेटीयन सेटलमेंटची सविस्तर माहिती देत, ही वसाहत सन 1972 मध्ये स्थापन झाल्याचे सांगितले. तसेच, भेटीस वेळ दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानून तिबेटीयन सेटलमेंटच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेटलमेंट ऑफिसर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तिबेटीयन कॅम्पला भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यावर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी लवकरच कॅम्पला भेट देण्याचे आश्वासन दिले. भेटीच्या शेवटी कृतज्ञतेच्या भावनेतून सेटलमेंट ऑफिसर तेनझिन त्सांगपा यांनी तिबेटचे आध्यात्मिक नेते परमपूज्य दलाई लामा लिखित “Voice for the Voiceless” हे पुस्तक तसेच शुभचिन्ह असलेला पांढरा स्कार्फ जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिला.





