केशोरी पोलिसांच्या तपासाला यश; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा कठोर निकाल
केशोरी, (गोंदिया) दि. २३ : अर्जुनी मोरगांव तालुका अंतर्गत येत असलेल्या प्रतापगड येथील उमेश राजू रामटेके (वय ३६) याला दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय, DJ-3 यांनी दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. यापैकी स्वतःच्या 9 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांखाली सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दोन्ही प्रकरणांचे निकाल शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लागले.
केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीने स्वतःच्या नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच आपल्या आईवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिला व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री सतीश घोडे व श्री चुटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(f) अंतर्गत १५ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, POCSO कायद्याच्या कलम ६ अंतर्गत जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, तसेच BNS कलम ३५१(३) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दुसऱ्या प्रकरणात, गुन्हा क्रमांक ३३/२०२४ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता व POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १२ एप्रिल २०२४ रोजी रात्री प्रतापगड येथे १७ वर्षे ५ महिने वयाची पीडिता घरी झोपलेली असताना आरोपीने घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर पीडितेशी गैरवर्तन करून शारीरिक सुखाची मागणी केली व तिचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सतीश घोडे व श्री चुटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीला नमूद विविध कलमांखाली तीन ते पाच वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. त्यामध्ये भादंवि कलम ४५० अंतर्गत पाच वर्षे, कलम ३५४ अंतर्गत तीन वर्षे, कलम ५०६ अंतर्गत तीन वर्षे आणि POCSO कायद्याच्या कलम ८ अंतर्गत तीन वर्षे व कलम १२ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावासाचा समावेश आहे.
केशोरी पोलिसांच्या कामगिरीची चर्चा…
दोन्ही प्रकरणांत केशोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची कार्यवाही केली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस ठाण्याच्या कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे यांनी काम पाहिले. उत्कृष्ट तपासाबाबत मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. राजेश तटकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, पोलीस स्टेशन केशोरी चे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. चेतन ढेकणे यांनी कौतुक केले आहे. दोन स्वतंत्र गुन्ह्यांतील निकाल एकाच दिवशी लागल्याने या प्रकरणांकडे परिसराचे लक्ष वेधले गेले आहे.





