गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा 25 दिवसाचे उपचारादरम्यान नागपुर मेडीकल मध्ये मंगळवार, 31 डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे रागिनी अनिल मसराम (वय 25) ही महिला 6 डिसेंबरला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेथील डॉक्टरांनी रात्री 10 वाजता सदर महिलेची नार्मल प्रसूती केली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुतीनंतर टाके लावताना चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्याने सदर महिलेच्या प्रकृतीत गंभीर परिणाम झाला. लगेच तिला गोंदिया सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तिथून नागपूरला हलविण्यात आले. नागपूर येथे भरती केल्यानंतर तपासणी अंती टाके लावताना शौचाची नळी फाटल्याने सदर महिलेच्या शरीरात संसर्ग झाल्याने तिच्या किडनी व मेंदू वरती आघात झाल्याचे सांगण्यात आले. तब्बल 25 दिवसानंतर नागपूर मेडिकल मध्ये उपचार घेत असताना 31 डिसेंबर रोजी सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
संबंधित डॉक्टरांवर कारवाई करा….
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वात व आदिवासी संघटनेच्यावतीने 31 डिसेंबर रोजी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांविषयी संताप व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला. नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे डॉक्टरांविरुद्ध निवेदन देण्यात आले. संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी व रागिनी मसराम यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे नमूद केले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल आणि आदिवासी संघटनातर्फे देण्यात आला आहे.





