सिंदेवाही, (भंडारा) : एका वयोवृद्ध नर वाघाचा मृतदेह लाडबोरी शेतशिवारात आढळून आल्याची घटना गुरूवार, 2 जानेवारी रोजी उघडकीस आली. मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असून विसेरा अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाने दिली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी गस्तीवर असताना रमेश गंडाईत यांच्या लाडबोरी येथील शेत सर्व्हे क्रमांक 343 च्या लगत एका नाल्याजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आला. वरिष्ठ वनाधिकार्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक एम. चोपडे, महेश गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, क्षेत्र सहायक एन. गडपायले, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, मुकेश भांदककर, स्वॉब नेचर केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर, राकेश अहुजा, डॉ. सुरपाम, डॉ. शालीनी लोंढे, डॉ. बजरंग सावरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असून, तो वयोवृद्ध असल्याने मृत्यूमुखी पडला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मृत वाघाची उत्तरीय तपासणी करून दहन करण्यात आले. मृत वाघाचा विसेरा प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. अहवालाअंतीच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.





