सडक अर्जुनी, (गोंदिया) : तालुक्यातील डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणार्या सर्व गावात विजेची समस्या निर्माण झाली आहे. उपकेंद्र अंतर्गत येणार्या खजरी, चिरचाडी व रेंगेपार भागात विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नाही. तर शेतकर्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. या संदर्भात महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांना वारंवार तक्रार व निवेदन देवूनही दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी संतापलेल्या नागरिक व शेतकर्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डव्वा उपकेंद्रातंर्गत येणार्या गावांमध्ये अचानक विज समस्येने डोकेवर काढले आहे. कमी दाब असल्याने पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर शेतकर्यांनाही पिकांना पाणी देताना चांगलीच अडचण जात आहे. या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही महावितरणच्या कर्मचार्यांनी सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी भेट घेवून ५ मार्च २०२५ रोजी बैठक घेतली. या बैठकीत महावितरणचे अधिकारी राठोड, फुलझेले, रेवतकर व सर्व अभियंता उपस्थित होते. महावितरणचे अधिकार्यांच्या समक्ष तालुक्यातील विज पुरवठ्याला घेवून निर्माण होणार्या समस्या मांडण्यात आला. यावर सर्व समस्या मार्गी लावण्याच्या सुचना आ.बडोले यांनी अधिकार्यांना दिल्यात. परंतु, या बैठकीला तब्बल २२ दिवसांचा अवधी लोटूनही समस्यांची दखल घेण्यात आली नाही. आतापासून ही स्थिती आहे तर भर उन्हाळ्यात कशी परिस्थिती राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करीत महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. दरम्यान सडक अर्जुनीचे सहाय्यक अभियंता रेवतकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून देवरी येथून मुख्य अभियंता फुलझेले हे कार्यालयात दाखल होवून समजुत घालण्याचा प्रयत्न केला. यावर नागरिक व शेतकर्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. आमगाव उपकेंद्र बंद असल्याने मोहाडी येथील वळवलेली डव्वा येथील वीज बंद करावी, क्षेत्रात विजेचा दाब सुरळीत ठेवावा आदि मागण्यांची त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने तुर्त आंदोलन मागे घेण्यात आले.
पाच दिवसांचा अल्टीमेटम…
डव्वा उपकेंद्रातंर्गत निर्माण झालेली विज समस्या नागरिक व शेतकर्यांच्या जिव्हारी आली आहे. कमी दाबामुळे पिण्याचे पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे. तर कृषी पंप काम करीत नसल्याने पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. यावर महावितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची तुर्त दखल घेवून समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, आगामी ५ दिवसात समस्या मार्गी लागली नाही तर उग्र आंदोलन करणार, असा इशारा सर्वसामान्य व शेतकर्यांनी दिला आहे. या आंदोलनात गौरेश बावनकर, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, राजेश कबगते, जगदीश डोंगरवार व रेंगेपार येथील सरपंच उपस्थित होते.



