जिल्हा परिषदेत प्लास्टीक बंदीचा संकल्प
गोंदिया : जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा परिषदेतील सुमारे १५५ कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांच्या मार्गदर्शनात प्लास्टीक संकलनाची मोहीम राबविली. यावेळी केवळ अर्ध्या तासाच्या अल्पावधीत १६ बोरे एकल वापराच्या प्लास्टीक चे संकलन करण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषदेत एकल वापराच्या प्लास्टीक पूर्णतः बॅन करण्यात आल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी करून कर्मचाऱ्यांनी कापडी पिशवी आणि वारंवार वापरता येईल, अशा साहीत्याचाच वापर करण्याचे आवाहन केले.
स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात कर्मचाऱ्यांची कचरा संकलनपूर्व बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रमीला जाखलेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, सामान्य प्रशासन विभाग तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनीक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिलीप खोटेले यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक संकलन करावयाच्या ठीकाणांची माहीती देवून प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परीणामांची तथा वृक्षारोपण मोहीमेची माहीती दिली. दरम्यान सारस चौक ते पोलिस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील अंतर्गत परिसरात एकल वापराच्या प्लास्टीकचे संकलन करण्यात आले.

उपक्रमात सामान्य प्रशासन विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, वित्त विभाग, पंचायत विभाग,आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला बालकल्याण विभाग, पशू संवर्धन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यांत्रीकी उपविभाग, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग, समग्र शिक्षण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, मग्रारोहयो, उमेद आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. आयोजनासाठी पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





