हलगर्जीपणामुळे वाहतुकीला अडथळा : संबंधितावर कारवाईची मागणी
गोंदिया : देवरी तालुक्यातील ककोडी मुख्य रस्त्यावर नवनिर्माण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीच्या सोयीकरिता पर्यायी पुलाची व्यवस्था संबंधित ठेकेदाराने करून दिली. मात्र, पर्यायी पुलावर फक्त माती टाकल्याने, पावसामुळे पुलावरील माती ओली झाली असून, त्यावरून येणाऱ्या गाड्या वारंवार फसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहतुकीला अडथळा होत आहे. कंत्राटदाराला संबंधित बाब निदर्शनात आणून दिली असता, कंत्राटदाराने हुकूमशाहीपना दाखवत उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
देवरी तालुक्यातील ककोडी गाव छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असल्याने या गावात आठवडी बाजार भरत असतो. बाजाराला परिसरातील तसेच छत्तीसगड राज्यातील अनेक नागरिक येत असतात. तसेच शिक्षणाकरिता बाहेर गावावरून विद्यार्थी येतात. राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे नागरिकांची गर्दी असते. अनेक नागरिक वेगवेगळ्ळ्या कामानिमित्त ककोडी गावाला भेट देतात. सदर मार्ग ककोडी गावाला येणारा मुख्य मार्ग असल्याने, येणारा तसेच जाणारा प्रत्येक प्रवासी याच मार्गाचा अवलंब करीत असतो. या मार्गावरून नाला वाहत असल्याने शासनाने वाहतुकीच्या सोयीकरिता नव्या पुलाची सोय करून दिली आहे. नवनिर्माण पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतुकीकरिता तात्पुरत्या पर्यायी पुलाची व्यवस्था संबंधित ठेकेदाराने केली. परंतु, पावसाच्या पाण्याने तात्पुरत्या पुलावरील माती ओली झाल्याने ये-जा करणारे वाहन फसत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदाराला क्षेत्राचे आमदार, तहसीलदार तसेच परिसरातील नागरिकांनी पर्यायी पूल मजबूत बनविण्यात यावा असे सांगण्यात आले. परंतु ठेकेदाराने आपल्या मनमर्जीपणाने पर्यायी पूल हा कच्चा बनविला आहे. यावरून येणारे वाहन फसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहनांचे नुकसान होत आहे. तरी परिसरातील नागरिकांनी पर्यायी पुलाची उत्तमपणे सोय करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
उत्तम दर्जाच्या पूलाची व्यवस्था करा..
आमदार संजय पुराम यांच्यासह देवरीचे तहसीलदार यांनी सदर पर्यायी पुलाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला वाहतुकीकरिता उत्तम दर्जाच्या पर्यायी पूलाची व्यवस्था करावी असे सांगितले. परंतु, कंत्राटदाराने यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत हात वर केले आहे. अश्या हलगर्जीपणा दाखविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.





