आमगाव, (गोंदिया) : मंडल आयोगाने हक्क अधिकार बहाल करून शेतकरी कामगार जातींचे ओबीसी अस्तित्व निर्माण केले आहे. परंतु अजूनही मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू झालेल्या नाहीत. त्यानंतर 2005 पासून नाचिअप्पन कमिटीच्या शिफारसी संसदेत धूळ खात पडून आहेत. त्यासाठी सर्वांनी संघर्ष करून आपला सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक विकास व या देशातील सत्ता संपत्ती मधील भागीदारीचा मार्ग प्रशस्त करावे, असे आवाहन ओबीसी सेवा संघ गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉ. गुरुदास येडेवार यांनी मंडल यात्रेच्या सभेत केले.

ओबीसींची जनगणना त्वरित सुरू करण्यात यावी, महाजोती संस्थेला 1000 कोटी रुपयांच्या बजेट अवंटीत करावे या प्रमुख दोन मागण्यांसाठी विदर्भात २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान मंडल यात्रेचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंचच्या नेतृत्वात इतर ओबीसी संघटनांच्या सहकार्याने करण्यात आले होते. ही मंडल यात्रा नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातून मार्गक्रम करीत ६ जूनला सायंकाळी ५ वाजता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे पोहोचली असून भव्य स्वागत, बाईक रॅली ने नगर भ्रमण करीत यात्रेचे रूपांतर सभेत झाले. यासभेचे अध्यक्षस्थान ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी.एम. करमकर यांनी भूषविले. मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम, डॉ. गुरुदास येडेवार ,निखिल बनसोड, सविताताई बेदरकर, चंद्रकुमार बाहेकर यांनी सभेला मार्गदर्शन केले.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके, ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, शंकर पाल, सुभाष उके, ओबीसी सेवा संघाचे गोंदिया तालुकाध्यक्ष रामभागात पाचे, ओबीसी सेवा संघाचे आमगाव तालुकाध्यक्ष हरीश ब्राह्मणकर, ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष लिलाधर गिरेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही, अर्थसंकल्पात संख्याप्रमाण वाटा मिळत नाही तोपर्यंत ओबीसी, एसबीसी, व्हीजे एनटी समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार नाही, म्हणून सर्वांनी मंडल ओबीसी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करीत वसतिगृह, महाज्योती संस्थेच्या योजनांची माहिती दिली. जाती विसरून ओबीसी म्हणून संघटीत व्हा असे म्हणत निखिल बनसोड यांनी मार्गदर्शन केले. प्रा.बी. एम. करमकर यांनी तुम्ही अन्य कितीही यात्रा करा आपल्या मुलाबाळांचा विकास या मंडल यात्रेनेच होणार आहे, सांगत स्त्रियांनी व्रतवैकल्ये कर्मकांड यातून बाहेर पडावे व आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यावे असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले. मंडल यात्रेची व समाजातील बुद्धिवादी लोकांची भूमिका सावन कटरे यांनी मांडली. सुरेंद्र मेंढे यांनी संचालन व रोहित हत्तीमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यशस्वीतेसाठी देवचंद बिसेन, दिपक मेंढे, विनायक येडेवार, मुरलीधर करंडे, महेंद्र चव्हाण, विकास पटले, कुणाल शिवणकर ,भुमेश शेंडे, बालू वंजारी, हरीश राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.





