देवरी (गोंदिया) : देवरी-आमगाव मार्गावरील बोरगाव समोरील नवातलाव नजीक आज, (ता. २४) ला सकाळी ९ वाजता सुमारास रस्त्याच्या कडेवरील एक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी एकत्र येत तत्काळ रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
सविस्तर असे की, देवरी-आमगाव राज्य मार्गावरील सतत होणाऱ्या पावसामुळे, जमिनीला ओलावा असल्याने रस्त्याच्या कडेला असलेले मोवई चे एक धोकादायक झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. परंतु, रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली होती. बोरगाव येथील ग्रामस्थांना सदर घटनेची माहिती मिळताच, नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. यात जगपाल वैद्य, संदेश मेश्राम, प्रमोद काळसर्पे, छेदिलाल शहारे यांच्यासह काही ट्रक, बस चालकांनी कुऱ्हाडीच्या साहाय्याने झाड कापून बाजूला केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. बोरगाव परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक धोकादायक झाडे उभी आहेत. या संदर्भात वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. जर अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष दिले असते, तर नागरिकांना असा त्रास सहन करावा लागला नसता, भविष्यात अशी आणखी झाडे कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरगाव निवासी जगपाल वैद्य यांनी दिली.
झाड पडल्याने देवरी-आमगाव मार्ग ठप्प; बोरगाव वाशीयांनी श्रमदानाने मोकळा केला रस्ता
RELATED ARTICLES



