नियम मोडणाऱ्यांवर कारवाई : एसपी भामरे यांच्या हस्ते ‘सीसीटीव्ही’ नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
गोंदिया : गोंदिया शहरात वाहन चालकांच्या संख्येत वाढ झाली असून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, याकरिता गोंदिया वाहतूक पोलिसांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एएनपीआर (‘ANPR’) कॅमेरा बसविण्यात आला असून, जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर लक्ष ठेवणार आहे. यामुळे नियम तोडणार्यांवर थेट कारवाई करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आता वाहतूक नियम मोडने महाग पडणार असून या कॅमेरेची वाहनचालकांवर नजर राहणार आहे.

शहरात वाहतुकीचे नियम सर्हास मोडले जातात. सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या चौकांतही, वर्दळीच्या चौकांतच नाही तर अगदी वाहतूक पोलिसांच्या समोरून सिग्नल मोडून हे वाहनचालक वाहन वळवतात. यात सिग्नल पाळणार्यांची पंचाईत होते, नाहक अपघाताला सामोरे जावे लागते किंवा शिवीगाळही सहन करावी लागते. हे अनुभव बर्याचदा येतात. यामुळे अशा मुजोर वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा एआय कॅमेरांद्वारे थेट दंडाच्या पावत्या फाडणार आहे. शहरात सध्या प्रायोगिक तत्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. यानंतर वर्दळीच्या चौकात, मुख्य रस्त्यावर १५ एएनपीआर ANPR (Automatic Number Plate Recognition) कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामुळे शहरात वाहतूक नियमभंग करणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे सोपे होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगीतले. ते २५ ऑगस्ट रोजी येथील वाहतूक शाखेत एएनपीआर कॅमेरा नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेर्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचे काम याद्वारे केले जाणार असल्याचे वाहतुक विभागाचे पोलिस निरिक्षक नागेश भास्कर यांनी सांगीतले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अजय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहिणी बानकर, पोलिस निरिक्षक किशोर पर्वते, पुरुषोत्तम आहेरकर यांच्यासह जिल्हा पोलिस दल, वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.एएनपीआर ANPR म्हणजे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन. हे एक अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान वापरून नंबर प्लेट्स ओळखता येते. हे कॅमेरे रस्त्यावर वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. जेव्हा एखादा चालक सिग्नल तोडणार किंवा चुकीच्या बाजूने वाहन चालविणार, तेव्हा कॅमेरा त्याचे वाहन आणि नंबर प्लेट स्कॅन करतो. नियमांचे उल्लंघन करणार्यांची माहिती आणि फोटो या कॅमेर्याद्वारे गोळा करून, वाहनधारकाला ऑनलाइन ई-चालान पाठवले जाणार आहे. यामुळे नियम मोडणार्यांवर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. सर्व नोंदी ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध राहणार असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता येईल. वाहनधारकांना दंड ऑनलाइन पोर्टलवर भरता येणार आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याची सक्ती वाढणार ते आणि रस्त्यावरील सुरक्षेतही सुधारणा होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल दंड…
अनेकदा पाठीमागून येणारे हुल्लडबाजी करणारे वाहनचालक इतरांना वाहतुकीचे नियम पाळण्यापासून परावृत्त करतात. असे अनेक प्रकार खासकरून सिग्नलवर घडत असतात. एखाद्याने सिग्नल पाळला तर त्याला शिवीगाळ केली जाते, अश्लील हातवारे केले जातात, दमदाटी केली जाते. मोठमोठ्याने हॉर्न वाजवून त्याला त्रासही दिला जातो. यामुळे तो नियम पाळणारा वाहनचालक भीतीने बाजुला होतो किंवा सिग्नलवर पहिल्याच रांगेत असेल तर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेतो आणि त्या वाहनचालकाला वाट मोकळी करून देतो. असे झाले तर एआय कॅमेरा मागचा पुढचा विचार न करता या गुंडगिरीला बळी पडलेल्या वाहनचालकालाही दंड करणार आहे.





