Monday, April 13, 2026
spot_img

मोबाईल स्क्रिनिंग – एक मोठा सामाजिक धोका; प्राची गुडधे यांचा देखाव्यातून समाजाला संदेश

गोंदिया : आजच्या विज्ञानयुगात मोबाईल माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. परंतु त्याच मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. ‘मोबाईल ही गरज आहे, पण व्यसन होऊ नये’ या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आदर्श कॉलनी, गोंदिया येथील प्राची प्रमोद गुडधे यांनी गणपतीच्या देखाव्यातून अनोखी जनजागृती केली.
आज शाळकरी मुलं अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमली आहेत. सततच्या स्क्रिनिंगमुळे डोळ्यांचे आजार, मेंदूवर ताण, चिडचिड, सामाजिक एकटेपणा अशी समस्या दिसू लागली आहे. तरुणाईत नैराश्य, चिंता, झोप न लागणे अशी लक्षणं वाढत आहेत. मोठ्यांमध्येही संवादाऐवजी फक्त मोबाईलचं व्यसन वाढत असल्याने कुटुंबातील नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत. गणपतीच्या मंडपात मांडण्यात आलेल्या देखाव्यातून “मोबाईल स्क्रिनिंगचे दुष्परिणाम” प्रभावीपणे दाखवण्यात आले. मोबाईलमध्ये बुडालेली मुलं, पालकांपासून दुरावलेला संवाद, घरातील शांत वातावरण, मानसिक तणावाने ग्रस्त समाज या सर्व बाबींचं जिवंत चित्रण करण्यात आलं. पाहणाऱ्यांना हे दृश्य धक्का देणारं, विचार करायला लावणारं आणि अंतर्मुख करणारं होतं. या देखाव्यामुळे अनेकांनी आपल्या कुटुंबात होणाऱ्या बदलांची जाणीव व्यक्त केली. “आपण आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळ तर करत नाही ना?” हा प्रश्न सर्वांच्या मनात उमटला. मोबाईलचा अतिरेकी वापर थांबवून, संवाद पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्याचं स्पष्टपणे जाणवून दिलं. प्राची प्रमोद गुडधे यांनी सदर उपक्रम राबविताना सांगितले की, “मोबाईल हा काळाची गरज असला तरी संयमाने वापरला पाहिजे. संवाद हरवला तर नाती तुटतात आणि नाती तुटली तर समाज विखरतो. हाच संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गणेशोत्सव समाजजागृतीचे एक व्यासपीठ..
गणेशोत्सव हे फक्त उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे पर्व नसून समाजजागृतीचे एक व्यासपीठ आहे. त्याचा योग्य उपयोग करत नागरिकांना मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम दाखवून एक अर्थपूर्ण संदेश देण्यात आला. मोबाईल न वापरण्याचा संदेश नाही, पण मर्यादित वापर, आत्मसंयम आणि परिवाराशी संवाद यावर भर देणारा हा देखावा समाजासाठी आरसा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular