Wednesday, January 21, 2026
spot_img

आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन तुर्त मागे

कोसमतोंडी येथील भ्रष्टाचार प्रकरण : ग्रामसेवक व सरपंचाची भुमिकेवर प्रश्नचिन्ह
सडक अर्जुनी, (गोंदिया) : तालुक्यातील कोसमतोंडी येथील सन २०२२ ते २०२४ या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली होती. या संदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना २२ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. परंतु, चौकशीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर १० सप्टेंबर रोजी गावकर्‍यांनी एकवटून आंदोलनाची भुमिका घेतली. यावर खळबळून जागा झालेल्या पं.स.प्रशासनाने सात दिवसात चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकर्‍यांनी तुर्त आंदोलन मागे घेतले. परंतु, सात दिवसात चौकशी पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
कोसमतोंडी येथील ग्राम पंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी इतर सदस्य व गावकर्‍यांना विश्वासात न घेता मनमर्जी कारभार सुरू केला आहे. कसलेही कामे न करता शासन निधीची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. हा प्रकार गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी जाब विचारला. यावर उत्तर न मिळाल्याने गावकर्‍यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना २२ ऑगस्ट २०२५ रोजी निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. अन्यथा उग्र आंदोलन करणार, असा इशारा देखील दिला होता. मात्र १७ दिवस लोटूनही गटविकास अधिकारी यांनी चौकशी न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे संतापलेल्या नागरिकांनी १० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय ठिय्या आंदोलन सुरू केले. या ठिय्या आंदोलनाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी अधिकारी पाठवून आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. आजपासून चौकशी केली जाणार असून आगामी सात दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल आंदोलक ग्रामस्थांना देण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकर्‍यांनी तुर्त आंदोलन मागे घेतले. तसेच आश्वासनानुसार सात दिवसात चौकशी करून दोषीवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात पं.स.उपसभापती निशा काशिवार, तंमुस अध्यक्ष गौरेश बावनकर, प्रकाश काशिवार, ग्रा.प.सदस्य कुंदा मळकाम, शकुंतला काशिवार, संगिता काशिवार, विनोद काशिवार, विजय बावनकर व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

ग्रामसभेत झाले होते पितळ उघड…
कोसमतोंडी ग्राम पंचायतीत १५ वित्त आयोगाचे ग्रामविकासाठी आलेल्या निधी गावविकासावर खर्च न करता अफरातफर करण्यात आली. विकासकामांच्या नावावर काम न करताच ग्रामसेवक विलास गोबाडे व सरपंच महेंद्र पशिने यांनी पैशाची उचल केली. ही बाब २२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत उघडकीस आल्याने भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले. ग्रामस्थांची दिशाभूल करुन शासकीय निधीची अफरातफर करून भ्रष्टाचार व गावांतर्गत केलेल्या निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ता बांधकामाला घेवून गावकर्‍यांनी पंचायत समिती प्रशासनाला तक्रार केली होती. मात्र तक्रार करून सलग १७ दिवस लोटूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular