सडक अर्जुनी, (गोंदिया) : नागपूर विभागीय आधारभूत धान खरेदी फेडरेशन अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी संघटनेचे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या पाचही जिल्ह्यातील सर्व धान खरेदी संस्था संघटनेची सभा सौंदड येथील दि. सहकारी भात गिरणीच्या कार्यालयात शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी पार पडली.
धान खरेदी विषयी संस्थांना येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पाचही जिल्ह्यातील संस्थांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. सभेचे अध्यक्ष भेरसींग नागपूरे यांनी खरेदी संस्थावर होत असलेल्या अन्यायाबाबत अनुसंगीय खर्चाच्या रकमेत वाढ करण्यात यावी. पुरवठादार, मिलर्स यांचे कडून पुरविण्यात आलेला जुन्या बारदाण्यावर दहा टक्के बारदाना जो जीर्ण अवस्थेत आहे, तो कमी करण्यात यावा. धानाची उचल उशिरा होत असल्यामुळे येणारी घट कमी करण्यात यावी, ती संस्थेच्या माथी मारू नये. गोडाऊन भाडे, कमीशन व हमाली ही रक्कम फेडरेशनने संस्थांना नियमित द्यावी, अशा मागण्या यावेळी सभेत मांडल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व संस्था प्रतिनिधींनी या विषयांवरील मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सदर सभेला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





