Sunday, January 18, 2026
spot_img

गोंदिया जिल्ह्याने देशाच्या संरक्षणार्थ सैनिक दिलेले आहेत, ध्वजनिधी देऊनही सेवा करेल : जिल्हाधिकारी प्रजित नायर

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आजपासून शुभारंभ
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याने देशाच्या संरक्षणार्थ सैनिके दिलेले आहेत, यापुढेही देत राहील. यासह ध्वजनिधी देऊनही देशसेवा करेल, असे प्रतिपादन सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
येथील नियोजन भवन सभागृहात आज (ता.10) सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) ज्योती कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, एकूण महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्याला मिळालेले ध्येय 0.8% आहे. सन 2024 मध्ये जिल्ह्याला 37 लाखाचे ध्येय देण्यात आलेले होते. यामध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी करुन 33 लक्ष 91 हजार रुपये म्हणजेच प्राप्त उद्दिष्टांपैकी 92% निधी संकलित केले आहे. सैनिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत असून तिरोडा येथील वीर पत्नी यांच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. यासह सैनिकांसाठी कॅन्टीनचाही विषय बैठकीतून लवकरच मार्गी निघेल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी सैनिक आणि शहीद सैनिकांसाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. माजी सैनिकांना, शहीद कुटुंबांना काही अडचणी येत असल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी आश्वासकता त्यांनी दर्शविली. सामान्य नागरिकांनी सुध्दा ध्वजनिधी संकलनात आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
न्यायाधीश श्री. वाळके यांनी कार्यक्रमात 11 हजार रुपये ध्वजनिधीसाठी देण्याची घोषणा केली. ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासंदर्भातील क्यूआर कोड तयार करून तोही प्रत्येक विभागात देण्यात यावा अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. माजी सैनिकांना लागणाऱ्या विधी सेवेबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडून मदत केली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
श्री. बेहरे म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वज निधीचा विनियोग केला जातो. मार्च अखेरपर्यंत 100 % उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प याप्रसंगी करुया असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून माहिती देत सांगितले की, दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. गोंदिया जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी केली असून जिल्ह्याला मिळालेल्या शासनाकडून प्राप्त उद्दिष्टाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याने 92 % उद्दिष्ट साध्य केलेले आहे तर वर्ष 2023 मध्ये जिल्ह्याने 102.91 % उद्दिष्ट साध्य केले होते असे त्या म्हणाल्या. सन 2025 मध्ये सदर निधी 100 % पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले. तर आभार सैनिक कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी मानले. कार्यक्रमास माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, पालावरची शाळेतील विद्यार्थी तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular