नवेगावबांध, (गोंदिया) : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ‘सिकलसेल ॲनिमिया जनजागृती पंधरवाडा’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज, २९ जानेवारी २०२६ रोजी, जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध येथे भव्य जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तपासणी कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. महेश लोथे यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. सिकलसेल होण्याची कारणे, त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि योग्य उपचार पद्धती यावर त्यांनी प्रकाश टाकला. हा आजार कसा टाळता येईल, यावर त्यांनी विशेष भर दिला. या प्रसंगी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. आरोग्य पथकातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जया वाळके, लॅब असिस्टंट शिशुपाल धोके आणि फ्लेबोटोमिस्ट निलेश सांगोलकार यांनी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून रक्ताचे नमुने संकलित केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये या जनुकीय आजाराबद्दल असलेली भीती दूर करून त्यांना वैज्ञानिक माहिती देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिकलसेल मुक्त समाजासाठी अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण झाली आहे.





