गोंदिया : गोंदिया जिल्हा म्हटले की, डोळ्यासमोर नक्षलग्रस्त प्रदेशाचे चित्र उभे राहते. पण जैवविविधतेने संपन्न अशा जंगलांनी वेढलेल्या या भागात एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. कचारगड गुफामध्ये आदिवासींचे कुलदैवत असल्यामुळे माघ पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेच्या वेळी येथे आदिवासी बांधवांची गर्दी दिसते. गोदिया-दुर्ग रेल्वे मार्गावर सालेकसावरुन दरेकसा मार्गावर सात किलोमीटरवर असलेल्या धनेगाव येथून कचारगडासाठी चढ़ाई सुरु होते. सालेकसातील गर्द वनराईमुळे एकुणच येथील वातावरण फेब्रुवारीत देखील मस्त थंड असते. यात्रेसाठी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी सारा परिसर फुलुन गेलेला असतो.
कचारगड गुफा ही आदिवासींचे श्रध्देचे ठिकाण असल्यामुळे दुरून येथे आदिवासी भाविक मोठ्या संख्येने येतात. आशियातील सर्वात मोठी गुफा महाराष्ट्रात येथे आहे. गोंदियातील 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे ही गुफा चर्चेत आली आहे. विविध राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुफेत असलेले आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहे. मागील 40 वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत असते. कचारगड गुफा प्राचीन काळापासून नैसर्गिक निर्मित आहे. या गुफेतुन आदिवासी गोंडीयन धर्माचे संस्थापक पारी कोपार लिंगो यांनी धर्मप्रचार सुरु केला होता, तेव्हापासून या गुफेला आदिवासींचे उगमस्थान संबोधले जाते. अतिशय घनदाट जंगलात ही गुफा आहे. त्यामुळे या गुफेला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. या परिसरात विविध गंभीर आजारांवर उपयोगात येणारी वनऔषधी झाडे पहायला मिळतात. कचारगड येथे गोंड समुदायाचा या संस्कृतीत सिंहाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळापासूनच कचारगड हे गोंडी संस्कृती, भाषा, रूढी-परंपराचे माहेरघर ठरले आहे. गोंडी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी कचारगड प्रसिद्ध आहे. गोंड व आदिवासी भाविक मोठ्या संख्येने कचारगड यात्रेत सहभागी होतात तसेच या गुफेत एक मोठी निसर्गनिर्मित विहीरसुद्धा आहे.
या विहीरीतील पाणी 100 टक्के शुद्ध असल्याचे बोलले जाते. या गुफेच्या काही अंतरावरच आणखी एक नैसर्गिक मोठी गुफा आहे. या गुफेत प्रवेश करण्यापाठी कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर अंतर पायी डोंगरावर चढावे लागते. प्रत्येकवर्षी या कचारगड यात्रेला विविध राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने हजर राहतात. जिल्हयातीलच नाही तर विदर्भातील सर्वात मोठे आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातून विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान होणार नाही यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनामार्फत यंत्रणांच्या व देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. घनदाट जंगलांनी वेढलेले कचारगड हे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त एक लोकप्रिय ठिकाण आहे.
-कैलाश गजभिये,
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया





