गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्यांसह शासकीय नोकरी, चारचाकी वाहन असलेल्या भगिनींना बाद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याअंतर्गत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पडताळणी केली जात आहे. या पडताळणीअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल २५ हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. यातील जवळपास १९२९ लाभार्थीचे या योजनेअंतर्गत अनुदान कायमचे बंद करण्यात आले आहे. तर जवळपास ६५१ बहिणींनी स्वतःहून अर्ज सादर करीत या योजनेतून माघार घेतल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर होताच राज्यभरासह जिल्ह्यातीलही अनेक महिलांनी सर्व अटींकडे दुर्लक्ष करीत अर्ज सादर केले होते. प्रारंभी शासनानेही याकडे गांभीर्याने न घेता सर्वच अर्ज पात्र करीत योजनेचा लाभ दिला. त्यानंतर मात्र, अनेक महिलांनी लांनी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने अनेक निकष लावत अर्जाची तपासणी सुरू करून निकषांची पूर्तता न करणाऱ्या बहिणींचे नावे वगळून त्यांना योजनेतून बाद करण्यासण्यास सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यात २.६३ लाख महिलांनी अर्ज सादर केले होते. यातील २.६२ लाख अर्ज ग्राह्य ठरले होते.”महिलांनी संजय गांधी, शेतकरी सन्मान योजना आदींसह इतर योजनांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. यासोबतच अनेक नोकरदार महिलांसह कुटूंबात चारचाकी वाहन असलेल्या भगिनींनीही या योजनेची रक्कम बळकावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर महिलांनी माहिती संकलित करणे सुरू करण्यात आले असता जिल्ह्यातील जवळपास २४ हजार ९२९ लाभार्थी महिला या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ हजारांहून अधिक महिलांनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभघेतल्याचे १० हजारांवर महिलांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले. तालुकास्तरावर प्राप्त यादीनुसार केलेल्या पडताळणीनुसार २५ हजारांच्या आसपास लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.
श्रीमंत लाडक्या बहिणीही योजनेत…
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करताना निकष न तपासता मंजूर केले होते. यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडल्याने प्रशासनाकडून लाभार्थ्यांची यादी युद्धपातळीवर तपासणी जात आहे. तपासणीत अनेक बोगस अर्ज समोर आले आहेत. यामध्ये दुहेरी योजनाचा लाभघेणे, नोकरदार कुटुंबातील महिलांद्वारे लाभ एवढेच नव्हे तर खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांसह अनेक श्रीमंत लाडक्या बहिणींनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येणार असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या बहिणींची संख्या आणखी घटण्याची चिन्हे आहेत.
एका घरात दोनच लाडक्या बहिणी…
लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. एकाच कुटूंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे वापरून कुटुंबातील तिसऱ्या -चौथ्या महिलेनेही या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले असून, अशा लाभार्थी महिलांच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे. यामुळे या महिलांना मिळणारा लाभ बंद होणार असल्याने लाभार्थी महिला धास्तावल्या आहेत.



