Tuesday, April 21, 2026
spot_img

भूत आणणे म्हणजे नाटक करण्याची बिमारी : प्रा. प्रकाश धोटे

गराडा येथे अंधश्रध्दा निर्मुलन प्रबोधन
तिरोडा, (गोंदिया) : भूत, भानामती ही अंधश्रध्दा आहे. भूत कुणीही पाहीले नाही. भूत पाहील्याचे जर कुणी सांगत असेल तर तो खोटा बोलत आहे. भूत अंगात आणणे म्हणजे नाटक करण्याची बिमारी असल्याचे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश धोटे यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत येथे शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अतुल गजभिये होते. गराडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. वेंकटेश रेवतकार, माजी उपसरपंच रविंद्र वंजारी, ग्रामपंचायत सदस्य मधुभाऊ हजारे, पोलिस पाटील प्रकाश मेश्राम, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विनोद पटले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल उके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील दखने यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. धोटे यांनी अंधश्रध्देवरील विविध प्रकारावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मेल्यावर जर भूत बनत असेल तर दररोज कोंबड्या बकरे यांना कापले जाते. त्यांचे मांस घरी घेवून जातांना त्यांचे भूत का बनत नाही? असा सवालही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. दरम्यान हातावर कापूर जाळणे, लिंबू कापून त्यातून रक्त काढणे, लिंबातून कापड काढणे, कानाने चिठ्ठ्यावर लिहीलेल्या नावाचे वाचन करणे आदी प्रात्यक्षिक करून त्याचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले. शिवाय भूत काढण्याचे आणि कुणाच्या अंगात भूत आलाच तर त्याला सूई टोचून वठणीवर आणण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. आयुष्य लहान आहे. ते महान बनविण्यासाठी शिक्षणाची कास धरा. विज्ञानाने मानवी आयुष्य सुकर केले. मोबाईल मधुन दूरवर बोलता येते. स्पीकर आपला आवाज मोठा करतो. हे विज्ञानाचे चमत्कार केवळ शिक्षण आणि संशोधनातूनच शक्य झाल्याचे सांगून अतुल गजभिये यांनी भानामती, अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्रावर कठोर प्रहार करीत डोळस होण्याचे आवाहन केले. तथा संत तुकाराम महाराज पासून तर संत गाडगेबाबा यांच्यापर्यंतच्या प्रबोधनाची अध्यक्षीय मार्गदर्शनातून माहीती दिली. माजी सरपंच रविंद्र वंजारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रम घेण्याची गरज विशद केली. गराडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच वेंकटेश रेवतकार, ग्रामपंचायत सदस्य मधुभाऊ हजारे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रविंद्र वंजारी यांनी करून आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांंसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular