Thursday, April 30, 2026

प्रलंबित समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन; सेवानिवृत कर्मचार्‍यांचा इशारा, संघटनेच्या सभेत निर्णय

गोंदिया : जिल्ह्यातील सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्‍यांच्या समस्यां शासन, प्रशासन स्तरावर प्रलंबीत आहेत. संघटनेच्या वतीने या संदर्भात अनेकदा संबंधीत विभागाशी पाठपुरावा करुन चर्चा व निवेदन देण्यात आले. परंतू प्रशासनाच्या वतीने सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाला १५ दिवसाचे अल्टीमेटम देवून संबधीत समस्या मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा सेवानिवृत संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला आहे. संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी संघटनेची सभा बुधवार, १३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे होते. सभेत सेवानिवृत्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने सेवानिवृतांच्या समस्यांना घेऊन शासन व प्रशासनाला पाठपुरावा करण्यात आला. अधिकारी व पदाधिकार्‍यांशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली. मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परंतू आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाहा. प्रलंबीत समस्या आज ना उद्या सोडविण्यात येणार या आशेवर सेवानिवृत कर्मचारी शासकीय कार्यालयांची पायपीट करीत आहेत. पण प्रशासन व शासनाकडून दखल घेतली जात नाही. या सर्व प्रकाराला घेवून असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान आयोजित सभेत प्रशासनाच्या भुमिकेवर संताप व्यक्त करून आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. १९ तारखेच्या पेंशन अदालतीनंतर जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. प्रलंबित समस्या १५ दिवसात मार्गी लावण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. सभेचे प्रस्ताविक उपाध्यक्ष पा.बी. लांजेवार यांनी मांडले तर आभार प्रदर्शन गोंदिया तालुका अध्यक्ष डी.एम. दखने यांनी केले. सभेला जिल्हा कार्यकारिणीत सेवानिवृत संघटनेचे अध्यक्ष एल.यु. खोब्रागडे, राज्य उपाध्यक्ष पी.आर. पारधी, सचिव पी.एन. बडोले, डी.एल. गुप्ता, टी.बी. भेंडारकर, मोहनलाल पटले, रेखा बोरकर, विमल तावाडे, ओ.के. बन्सोड, टी.एन. बहेटवार, सुरेश आष्टीकर, डी.बी. चौधरी, एन.डी. कारंजेकर, बी.एस. सोनवाने, डी.एन. गोलीवार, के.बी. सोनवाने, जी.एफ. अंबुले, डब्लू.डी. माहुरे, के.एस. होरे, डी.डी. बघेले, बी.एन. सहारे, अंबर बिसेन, आर.सी. नागभिरे, एस.एस. चोरनेले, वाय.बी. चावके, मंगेश पडोळे, एम.के. नाकाडे, आर.आर. चांदेवार, जी.एच. बुरडे व सभासद उपस्थित होते.

या समस्यांवर मंथन…
जिल्हातील सेवानिवृत कर्मचार्‍यांच्या उपदानातून कपात केलेली संगणक राशी परत मिळणे, मार्च २०२५ पासुन सेवानिवृत झालेल्या कर्मचार्‍यांचे उपदान व अंशराशीकरण परत करणे, ज्यादा वसुली रक्कम परत करणे, आरोग्य कर्मचारी व आरोग्य सेविकांना नक्षलभत्ता, संगणक राशी, कालबद्ध पदोन्नती, रजारोखीकरण व अतिप्रदान राशी मिळणे, चटोपाध्याय, निवड श्रेणी प्रकरण निकाली काढणे, जुलै २०२४ पासूनचा डीए अरिअर्स लागू करणे, गट बिमा, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, अर्जूनी मोरगाव तालुक्यातील १२ शिक्षकांचे एकस्तर वेतनश्रेणी प्रकरण निकाली काढणे, संघटनेच्या नागपूर विभागातील अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणे इत्यादी विषयावर चर्चा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular