नवेगांवबांध, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा सावरटोला येथे शतकानुशतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेनुसार यंदाही पोळ्यानंतर पाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता मार्बत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. परंपरा अबाधित ठेवत गावातील हौशी युवक व नागरिकांनी हनुमान मंदिर परिसरात भव्य मार्बत प्रतिमा उभारली.
संपूर्ण गावातून बँड व डीजेच्या गजरात “जागे मार्बत” व “ढेकूण मोंगसा घेऊन जा मार्बत” या जयघोषांनी उत्साहाचे वातावरण रंगले. मिरवणुकीदरम्यान प्रत्येक घरापुढे मार्बतची पूजा करून स्वागत करण्यात आले. शेवटी मार्बत गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यात आली.या प्रथेने गावातील आपुलकी, ऐक्य व स्नेहभाव अधिक वृद्धिंगत होत असल्याचे जाणवते. पोळ्यानिमित्त बाहेरगावी नोकरी करणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच गावकरी खास या सणासाठी घरी येऊन मिरवणुकीत सहभागी होतात. एकमेकांना अक्षतांची टीका लावून नमस्कार करण्याची परंपरा यावेळी जपली जाते. गावकऱ्यांचा विश्वास आहे की ही मार्बत मिरवणूक गावातील वाईट प्रथा, वेषण व संकट दूर नेऊन सुख-समाधान आणते. या कार्यक्रमासाठी इंजिनिअर सुनील तरोणे, पेंटर रितेश वैद्य, रवी मेश्राम, सुदेश राखडे, यादव तरोणे, संकर चाचाणे आदी युवकांनी परिश्रम घेतले. “परंपरेने चालत आलेल्या या प्रथेमुळे नवीन पिढीला संस्कारांचे आदर्श मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील,” असे मत इंजिनिअर सुनील तरोणे यांनी व्यक्त केले.सावरटोला गावकऱ्यांनी यंदाही उत्साह, आपुलकी व पारंपरिक श्रद्धेने मार्बत मिरवणूक साजरी करत समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले.





