प्रकल्प कार्यालयाच्यावतीने जनजातीय गौरव कार्यशाळेचे आयोजन
देवरी, (गोंदिया) : येत्या १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या वतीने जनजाती गौरव वर्ष जाहिर करण्यात आले आहे. याअतंर्गत देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जनजातीय गौरव कार्यशाळेचे आयोजन येथील गोंडवाना सभागृहात शुक्रवार (ता.२९ आगस्ट) रोजी करण्यात आले होते. यात उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींना लॅपटॉप वाटप करण्यात आले.
१५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती असल्यामुळे सदरच्या वर्षी भारत सरकारने जनजाती गौरव वर्ष जाहिर केले आहे. या निमित्ताने १५ सप्टेंबरपासून ते १५ नोव्हेंबर पर्यत आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आदिवासी राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र लढयामध्ये जे आपले बलिदान दिले आहे. त्यांचे स्मरणार्थ नवीन पिढिला ईतिहासातील त्याच्या कर्तृत्वाची माहिती व्हावी, त्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यानुसार देवरीच्या प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जनजातीय गौरव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्याअध्यक्ष स्थानी आमदार संजय पुराम होते. या प्रसंगी देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, नगराध्यक्ष संजू उईके, बोरगाव /बा.येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुलचे प्राचार्य गणेशकुमार तोडकर, गोंदियाचे वरिष्ठ पत्रकार अपूर्व मेठी, जयंत शुक्ला, जावेद खान प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल बोरगांव/बाजार येथील विद्यार्थीनी कु. अवंती गेंदलाल मडावी या विद्यार्थीनीची नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर या ठिकाणी लॉ पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. सदरच्या मुलीचा अभ्यासक्रम हा पुर्णतः ऑनलाईन प्रणालीवर अवलंबून असल्याने त्या विद्यार्थीनीची अभ्याक्रमामध्ये गैरसोय होवू नये, यासाठी न्युक्लिअस बजेट योजनेतून संबंधिति विद्यार्थीनीला लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहायचे वाटप करण्यात आले होते. सदर मुलीच्या आई-वडिलांना आमदारांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, नामांकित शाळेचे मुख्याध्यापक, वसतिगृहाचे गृहपाल तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.





