Wednesday, January 21, 2026
spot_img

एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका, मात्र काळजी घ्या : जिल्हाधिकारी नायर

जिल्हा आरोग्य विभाग सतर्क : चिंतेचे कारण नाही
गोंदिया
: कोरोना सारखे लक्षण असलेल्या विषाणुने (Human Meta Pneumo Virus (HPMV)) कोरोनाची आठवण ताजी केलेली आहे. सद्यस्थितित एचएमपीव्हीचे भारतामध्ये ४ रुग्ण आढळून आले असले तरी सदर आजाराबाबत कोरोनासारखी घाबरण्याची गरज नाही. कारण हा विषाणू नवीन नसून जुनाच आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या विषाणूविषयी चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे. खबरदारी म्हणून सर्दी, खोकला आणि फुप्फुसाच्या गंभीर संसर्गाच्या (SARI- Severe Acute Respiratory Infection) रुग्णांचे नियमीत सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे. या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने लहान मुले व वयोवृध्द व्यक्तींना (मधूमेह व उच्चरक्तदाब) होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराला काही प्रतिबंधात्मक उपाय करून सुध्दा रुग्ण बरे होऊ शकतात. त्याबद्दल सार्वजनीक आरोग्य विभागाकडून नागरीकांना खालील प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया यांनी नागरीकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे.

असे करा-
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने आपले हात वारंवार घुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर रहा.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

असे करू नये-
हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular