गोंदिया : हिवाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी जिल्ह्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. यंदाही जिल्ह्यातील तलाव, पाणवठ्यांवर परदेशी पक्ष्यांचे थवे नजरेस पडत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे. परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात वाढत्या थंडीत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू होते. अनुकूल वातावरण आणि हवे असलेले अन्नाची उपलब्धता लक्षात घेत हे पक्षी युरोपीयन देशातून जवळपास 10 हजार किमीचा प्रवास करून गोंदिया जिल्ह्यातील तलाव, पाणवठ्यांवर येतात. सायबेरीया येथून येणारे हे पक्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात पोहचतात. वसंत पंचमीपासून पक्ष्यांंचा परतीचा प्रवास सुरू होतो. विशेष म्हणजे, राज्यात एकट्या गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांचा अधिवास आहे. त्यात या विदेशी पक्ष्यांच्या आगमनाने निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडली आहे. दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ग्रेलॅक गुग्ज, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचार्ड, मलार्ड, गार्गेनी, आर्क्टिक टर्न, सायबेरियन स्टॉर्क, ब्लॅक टेलेड गॉडविट, कॉमन टिल, सायबेरिपन केन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क ब्लॅक हेडेड स्टॉर्क, ब्लॅक हेड एम्बिस, पांढरा स्तन, पट्टे स्टार्क, कार्पोस्ट, पॅरामपल मोर्डेन, वॉटरहेन, राखडी बगळा, व्हाईट ब्रेस्टेड कगिफिशर, टाईड किंगफिशर, कॉब डक, कमी पंख असलेला गरुड यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षीमित्र, निसर्गप्रमी व अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या परिसरात अधिवास….
जिल्ह्यात नवेगावबांध, संजयकुटी, सिरेगावबांध, लोहारा, सलंगटोला, बाजारटोला, परसवाडा, झिलमिली, आमगावचे नवातलाव, झालिया तलाव व अंजोरा तलाव परिसरात या पक्ष्यांना पाहता येते.
नागरिकांनी सहकार्य करावे….
जिल्ह्यात हजारो किमीवरून विदेशी पक्षी दाखल होतात. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषण व शिकार्यांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेची बाब आहे. तेव्हा तलाव शेजारी राहणार्या नागरिकांनीही या पक्ष्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहकार्य करावे.
मुकुंद धुर्वे, मानद वन्यजीव संरक्षक, गोंदिया





