Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे गुढीपाडवानिमित्त गोरेगावात शोभायात्रेचे आयोजन

गोंदिया : अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिणपीठ, नाणीज धाम, रत्नागिरी) यांच्या प्रेरणेने 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोरेगाव येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ, चैत्र प्रतिपदा तसेच वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यश व विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, पारंपरिक भारतीय संस्कृतीचे जतन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याच्या हेतूने संप्रदायाचे गुरुबंधू, भगिनी संप्रदायिक वेशभूषेत सहभागी होऊन जिल्हानिहाय शोभायात्रा काढली जाणार आहे. शोभायात्रेची सुरुवात गोरेगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिरापासून सकाळी 7.00 वाजता होऊन, ती ठाणा चौक, गाव भ्रमण आणि दुर्गा चौक येथे समारोपास येणार आहे. शोभायात्रेच्या आकर्षणात जगद्गुरू महाराजांची प्रतिमा, प्रभू राम दरबार, छत्रपती शिवाजी महाराज, संत मेळा, वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतिवीर बिरसामुंडा, भारतमातेचे वेशभूषा असणारे घोडेस्वार व अनेक सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे. यात युवक-युवतींनी आयोजित केलेली बाईक रॅली, भजनी मंडळ, कलशधारी महिला भगिनी, गुढीधारी भगिनी, झेंडे व पताकांनी शोभायात्रा अधिक उठावदार होणार आहे. यात्रेच्या दरम्यान संस्थानाचे जनकल्याणकारी उपक्रमांबद्दल जनजागृती केली जाईल. यात शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अल्पोपहार व समारोपाला महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. या मंगल सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व भाविक भक्तांना सहर्ष निमंत्रण देण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी यश, कीर्ती आणि विजयाचा आनंद अनुभवा, असे आवाहन सेवा समितीचे मार्गदर्शक विजय जोशी, अध्यक्ष मुलचंद खांडवाये, निरीक्षक नवरंग मेश्राम व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular