पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांची स्वीकृती, 350 कोटी मंजूर : आ. संजय पुराम यांच्या प्रयत्नाला यश
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्र असलेल्या आदिवासी बहुल जांभळी, निंबा, बाकलसर्रा, कहाली, पिपरिया, लटोरी, खेडेपार, पांढरी, पाऊलदौना ग्रामपंचायत परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम व सिंचन व्यवस्थेत वरदान ठरणाऱ्या कुवाढास (कोटीटोला) मध्यम सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वीकृती प्रदान करून 350 कोटी रुपये मंजूर केले असल्याने आमदार संजय पुराम यांनी शासन दरबारी सतत केलेल्या पाठ पुराव्याला यश मिळाले आहे. या परिसरात सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने भाजपचे तळफदार जेष्ठ नेते व तत्कालीन सिंचन मंत्री ना. महादेवराव शिवनकर यांनी सदर प्रकल्पाला शासन दरबारी प्रस्तावित केले होते. तेव्हापासून सहषराम कोरोटे यांना वगडता जवळजवळ सर्वच आमदारांनी सतत पाठपुरावा केला होता. सन 2014 ते 2019 या कालखंडात आमदार असतांना संजय पुराम यांनी सिंचन प्रकल्पा मंजुरी मिळावी यासाठी खूप परिश्रम घेतले होते परंतु त्याकाळी त्यांना यश संपादन करता आले नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा संजय पुराम यांनी भरभरीत यश संपादन करून आमदारकी मिळवली व सालेकसा तालुक्यातील कुवाढास (कोटीटोला) मध्यम प्रकल्पाला गती देण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला, या सिंचन प्रकल्पाला घेऊन मंत्रालयात अनेक सभा झाल्यात दरम्यान दिनांक 17 जून 2025 रोजी त्यांना यश मिळालं. सदर प्रकल्पाला मंजुरी देत पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी त्वरितच 350 कोटीचा निधी मंजूर केला आहे. आगामी होणाऱ्या शासनाच्या पुरवणी बजटमध्ये सदर निधी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत गरजेचा असलेल्या या बहूप्रतीक्षीत सिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मध्यम सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय पुराम यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुक केला जात असून महाराष्ट्र सरकारचे सुद्धा आभार व्यक्त केले जात आहे.





