एम.आय.डी.सी. मधील सुफलाम कंपनी परिसरातील घटना
देवरी, (गोंदिया) : देवरी येथील एम.आय.डी.सी. मधील सुफलाम कंपनी परिसरात असलेल्या सिमेंट विटा कारखान्यात एका मजुराचा सिमेंट विटा बनविणाऱ्या मशीन मध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ४:४५ वाजता दरम्यान घडली. रंजीत सदाराम सोनटक्के (वय ३८, रा. पिंडकेपार/गोटाबोडी. ता.देवरी) असे मृतक मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम येथे सुफलाम कंपनी असून या परिसरात सिमेंट विटा बनविण्याचा कारखाना स्थापन केला आहे. या कारखान्यात सिमेंट विटा बनविण्याचे काम चालू असते. मृतक रंजित आपल्या कुटुंबात कर्ता व्यक्ती असल्याने, उदरनिर्वाह करण्याकरिता नेहमीप्रमाणे ता. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सिमेंट विटा कारखान्यात साथीदारासह काम करण्याकरिता गेला होता. दिवसभर कारखान्यात काम केला. अंदाजे ४:४५ वाजे दरम्यान मृतक सिमेंट मिक्सर होणारा हंडा पाण्याने साफ करीत असताना, अपघात घडला. अपघातात मृतक इसम गंभीर जखमी झाला. कारखान्यात असणाऱ्या इतर मजुरांनी आरडाओरड केली. मृतकाला मशीनीबाहेर काढून प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे भरती केले. ग्रामीण रुग्णालय देवरी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता गोंदियाच्या खाजगी रुग्णालय येथे हलविण्यात आले. हालत गंभीर असल्याने गोंदियावरून नागपूरला उपचाराकरिता नेत असताना, भंडारा जवळ वाटेत प्राणज्योत मालवली. मृतकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय देवरी येथे करण्यात आले. घटनेची माहिती देवरी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.
सोनटक्के कुटुंबावर दुखाचे डोंगर…
लहानपणापासून वडीलाचा डोक्यावर हात नसलेल्या रंजीत याने कोणत्याही परिस्थितीला न डगमगता कोणतेही मजुरीचे कामे करून आई, पत्नी तसेच नऊ महिन्याच्या मुलीला कधीच कुठलाही कमीपणा होऊ दिला नाही. अचानक घडलेल्या घटनेमुळे सोनटक्के कुटुंबीयावर आभार फाटल्यागत परिस्थिती ओढविली आहे. गावातील होतकरू तरुण, कुटुंबाचा आधार गेल्याने पिंडकेपार गाव परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.





