Sunday, January 25, 2026
spot_img

दुधाळ जनावरांसाठी 50 टक्के अनुदान; विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु

गोंदिया, दि.15 : जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान प्रदान करणे आणि ग्रामीण रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने विदर्भ व मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा-2 सुरु करण्यात आला आहे.
दूध विकास प्रकल्प टप्पा-1 मध्ये मिळालेल्या यशाच्या अधारे, महाराष्ट्र शासनाने टप्पा-2 च्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आला असून यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये आधुनिक प्रशिक्षण सुविधा देखील उपलब्ध असतील. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकल्पांतर्गत जास्त दूध देणाऱ्या गायी आणि म्हशी दिल्या जातील. वंध्यत्वाचे निर्मूलन केले जाईल, पशुपालनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाईल, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह चारा पिके आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करुन दिले जाईल, अशी प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी www.https//vmddp.com या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करण्यात यावे. सदर अर्ज आपल्या घरुन किंवा ग्राम पंचायत किंवा दूध संकलन केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने करु शकता.
अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे : आधारकार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक, आधारकार्ड, राशन कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्डचे क्रमांक, दुधाळ जनावरांचे बिल्ला क्रमांक असावे.
अटी व शर्ती : किमान 8 ते 10 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय/म्हैशीचे वाटप. Digital Tracking Collar लावणे बंधनकारक. जनावराचा 3 वर्षापर्यंत विमा काढणे आवश्यक. खर्चाची मर्यादा 1 लक्ष रुपये (त्यापेक्षा जास्तीचा खर्च लाभार्थीला करावा लागेल). अनुदान 50 टक्के किंवा 50 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती देय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष : पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी 2 दुधाळ जनावरे असावीत. किमान तीन महिने जिल्हा दूध संघ/सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक (प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे). एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल. सदर योजनेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, डॉ. आंबेडकर चौक, कुडवा (गोंदिया) येथे संपर्क साधावा. असे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ.संजय गायगवळी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular