Monday, May 25, 2026

इटियाडोह धरण बघायला आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

चार वर्षीय विहान रॉय गंभीर जखमी
अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेला इटियाडोह धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने धरणाचे विहंगम दृश्य बघण्यासाठी अनेक पर्यटक ईटीयाडोह येथे येतात. आज, शनिवार, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आपल्या नातेवाईकासोबत आलेला चिमुकला पर्यटकावर बिबट्याने हल्ला करून जवळपास 100 फूट जंगल परिसरात ओढत नेले. सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. चिमुकला पर्यटक विहान रॉय (वय 4 वर्ष रा. दिनकर नगर) हा गंभीर जखमी झाला.
मागील अनेक वर्षांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राणी व मानव संघर्ष वाढत असल्याचे सततच्या घटनेवरून दिसून येत आहे. याआधी सुद्धा लहान बालकाला बिबट्याने गंभीर जखमी केल्याचे समोर आले होते. आज विहान हा त्याचा काका अजय सरदार वय वर्ष 25 राहणार दिनकर नगर यांच्यासोबत इटियाडोह धरण पाहण्यासाठी आला होता. धरण पाहून परत जात असताना गर्दीचे ठिकाण असलेल्या विश्रामगृह जवळील परतीच्या रस्त्यावर काकाच्या हातात आपले बोट पकडून चालत होता. मात्र, दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवत विहानचा पायाला पकडून ओढत नेले. लगेच काका अजयने परतवून लावण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र बिबट्याने थेट विहानच्या गळ्याला पकडून जवळपास शंभर फूट जंगलात ओढत नेले. त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुसंख्य पर्यटकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या विहानला सोडून पळाला. या बिबट्याच्या हल्ल्यात विहान हा गंभीर जखमी झाला तसेच घड्याळ दुखापत झाली. जखमी अवस्थेत विहानला अर्जुनी मोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर गोंदिया येथील गंगाबाई जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular