Tuesday, September 15, 2026
spot_img
spot_img
spot_img

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

गोंदिया, दि.6 : जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
6 जानेवारी 1832 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र सुरु केले. त्यानिमित्ताने 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र शासन ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करीत असतो. जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित पत्रकार देवेंद्र रहांगडाले, शाहिद पठाण यांच्यासह कार्यालयातील उपसंपादक कैलाश गजभिये, धम्मदिप बोरकर, तुषार उरकांदे, संतोष राऊत यांनीही आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्ये*
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला. त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम उपलब्ध करून दिली. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विविध विषयांचे बाळशास्त्री यांना ज्ञान होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना समाजाकडे सजगतेने पाहणाऱ्या बाळशास्त्रींना अनेक समस्या दिसून येत. पारतंत्र्य, अनिष्ट रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा होणाऱ्या समाजाच्या अधोगतीमुळे त्यांना चिंता वाटत असे. या सर्व समस्यांमधून मार्ग दाखविण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यासाठी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ‘दर्पण’ साडे आठ वर्षे चालले आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पायावर आज महाराष्ट्रातील पत्रकारितेची संस्कृती रुजली आहे आणि प्रगती करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular