Monday, June 8, 2026

आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस-जनता ऐक्याचा दिला संदेश; ‘संडे ऑन सायकल’ रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : २५० हून अधिक सायकलस्वार सहभागी
गोंदिया : “सुदृढ शरीर, सशक्त मन आणि सुरक्षित समाज” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त रूप देत गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक सायकल दिन आणि ‘फिट इंडिया अभियाना’ निमित्त दिनांक ०६ जून २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, कारंजा येथे “संडे ऑन सायकल” या विशेष उपक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. मा. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, पोलीस मित्र, विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध क्षेत्रांतील सुमारे २५० हून अधिक सायकलप्रेमींनी पोलीस मुख्यालय, कारंजा येथे हजेरी लावली. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ५ किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीला सुरुवात झाली. श्रीमती रोहिणी बानकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांनी हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅली ची औपचारिक सुरुवात केली. ही रॅली फुलचूर मार्गे मार्गक्रमण करत कमालीच्या शिस्तीत आणि उत्साहात पुन्हा पोलीस मुख्यालय येथे विसावली. सायकलिंग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची साधना नसून स्वच्छ पर्यावरण, मानसिक स्वास्थ्य आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा मार्ग आहे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खाकी वर्दीतील कर्तव्यकठोरता बाजूला ठेवून पोलीस अधिकारी आणि सामान्य नागरिक एकाच रंगात रंगून आरोग्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा संकल्प करत होते. कार्यक्रमात सहभागींनी नियमित व्यायाम, योग, सायकलिंग आणि आरोग्यदायी सवयी आत्मसात करण्याचे आवाहन स्वीकारले.

तंदुरुस्त जीवनशैलीचा रुजविला संकल्प…

“आरोग्यदायी नागरिक हेच राष्ट्राची खरी ताकद आहेत” हा संदेश देणारा गोंदिया पोलिसांचा “संडे ऑन सायकल” उपक्रम केवळ एक उपक्रम न राहता आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस–जनता सहभाग यांचा एक प्रेरणादायी उत्सव ठरला. या उपक्रमाने प्रत्येक सहभागीच्या मनात तंदुरुस्त जीवनशैलीचा नवा संकल्प रुजविला.

यशस्वीतेसाठी यांनी केला सहकार्य….
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर, श्री. रामदास शेवते (प्रभारी पोलीस उपाधीक्षक, गृह), श्री नागेश भास्कर (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा गोंदिया), श्री. राजेश सरोदे (राखीव पोलीस निरीक्षक), श्री. दीपक शेंडे, (राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय गोंदिया), श्री. श्रीकांत हत्तीमारे (पोलीस उपनिरीक्षक, नक्षल सेल गोंदिया), तसेच पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखा प्रमुख, तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार हे आवर्जून उपस्थित होते. या रॅलीत ‘संडे सायकल ग्रुप गोंदिया’ चे सदस्य, तसेच आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध धावपटू श्री. मुन्ना यादव यांनी देखील आपली विशेष उपस्थिती नोंदवून उपक्रमाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular