Sunday, September 13, 2026
spot_img
spot_img
spot_img

तीन दिवसांच्या नवजात बालकाच्या मृत्यूने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तणाव

शवविच्छेदनास नातेवाईकांचा सुरुवातीला नकार; पोलिसांच्या समजावणीनंतर दिली संमती
गोंदिया : तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या तीन दिवसांच्या नवजात बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने सोमवारी रात्री काही काळ रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना 31 ऑगस्टच्या रात्री सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास घडली. शवविच्छेदनावरून सुरुवातीला नातेवाईकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिस व रुग्णालय प्रशासनाने केलेल्या समजावणीनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनास संमती दिली. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील महिलेला प्रसूतीसाठी 29 ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन तिने नवजात बालकाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर आई आणि नवजात बालक दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. 31 ऑगस्टच्या रात्री सुमारे 12.30 वाजता नवजात बालकामध्ये कोणतीही हालचाल दिसत नसल्याची माहिती ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना देण्यात आली. डॉक्टरांनी तपासणी केली असता नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अचानक झालेल्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक तसेच इतर नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच हवालदार सुनील नागपुरे आणि पोलीस कर्मचारी मोहित चौधरी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी नातेवाईकांनी नवजात बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू नये, अशी मागणी करत आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढली. नवजात बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनास संमती दिली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार…
सुरुवातीला आई आणि नवजात बालकाची प्रकृती सामान्य होती. प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई झोपलेल्या अवस्थेत बालकाला स्तनपान करीत असताना त्याचा श्वास बंद पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नवजात बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
– डॉ. राहुल शेंडे,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular