गोंदिया : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. त्यातच आज (ता. ६) सायंकाळी ४.३० ते ५ वाजता सुमारास बालाघाट टी-पॉईंटवर दुचाकीने जात असलेल्या महिलेला टिप्परने धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार महिला व एक मुलगी जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, हा अपघात प्रवण क्षेत्र असून वाहतूक पोलिसांच्या निगराणीत आहे. त्यातही अपघात झाल्याने पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
सविस्तर असे की, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक भिमघाट येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित होता. मिळालेल्या माहितीनुसार कटंगी येथील बल्ले यांचे नातेवाईक एक महिला व दोन मुले हे दुचाकीने भिमघाट येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना बालाघाट टी-पॉईंटवर विरूध्द दिशेने येणार्या टिप्पर क्र.एमएच-३५/एजे-९४९७ च्या चालकाने लापरवाहीने चालवून दुचाकीला चिरडले. या घटनेत दुचाकीस्वार महिला व एक मुलगी जागीच ठार झाली तर एक मुलगा गंभीररित्या जखमी झाला. जखमीला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; बालाघाट टी-पॉईंटवरील घटना
RELATED ARTICLES



