गोंदिया, दि.15 : येत्या रविवारी 18 जानेवारी रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह, मरारटोली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात जिल्ह्यातील नागरिक लाभान्वित होतील. सदर महा शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
“विविध विभागातील दालन उभारण्यात येतील”
या विधी सेवा महा शिबिरात महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिव्यांग विभाग, पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, महावितरण विभाग, महिला व बालकल्याण, प्रादेशिक वनविभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा उपनिबंधक, आदिवासी विभाग, कामगार विभाग, पणन विभाग, उमेद, यांच्यासह अन्य विभागाचे दालन येथे असणार आहेत.
“नागरिकांना असा घेता येईल लाभ”
महसूल विभागाकडून जमिनीबाबत आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाईल. यासह विविध दाखल्यांचे अद्यावतीकरण, सातबारा विषयी माहिती मिळेल. आरोग्य विभागाकडून लावण्यात येणाऱ्या दालनामध्ये विविध असंसर्गजन्य रोगांची तपासणी केली जाईल, या अंतर्गत सिकलसेल, उच्च रक्तदाब, अन्य रक्त चाचण्या केल्या जातील. यासह तंबाखू विरोधी विषयी माहिती दिली जाईल. यासह ज्यांना भविष्यात अवयव दान करायचे असल्यास त्यांना अर्ज देण्यात येईल, तसेच आयुष्यमान भारत कार्ड संदर्भातही काही विशेष माहिती विचारायची असल्यास ती सुध्दा या ठिकाणी विचारून शंकांचे निसरण करण्यात येईल. पोलीस विभागाकडून लावण्यात येणाऱ्या दालनांमध्ये अमली पदार्थ सेवन दामिनी पथक नक्षलग्रस्त भागांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि अन्य कलमांची माहितीही देण्यात येईल. रस्ता सुरक्षा, वाहन परवानासाठी ऑनलाईन अर्ज संदर्भातील माहिती परिवहन विभागाकडून लावण्यात येणाऱ्या दालनाद्वारे देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामा संदर्भातील उपयोगिता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल, तर दिव्यांग विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही या ठिकाणी देण्यात येईल. पुरवठा विभागाकडून रेशन कार्डसाठीचे अर्ज स्वीकारले जातील, गॅस सिलेंडरची नवीन जोडणीसाठीचा अर्ज येथे करता येईल. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून स्वच्छता तसेच वजनमापे बाबत माहिती दिली जाईल. कौशल्य विकास विभागाकडून विविध कौशल्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ऊर्जा विभागाकडून सौर ऊर्जा बद्दलची जागरूकता आणि निवासी स्थानी तसेच शेतात बसविण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रांविषयी जागरूकता आणि माहिती या ठिकाणी दिली जाईल. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने वन स्टॉप सेंटर, अनाथ बालकांना कुटुंबात समाविष्ट करून त्यांना कौटुंबिक वातावरण देण्यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही या ठिकाणी मिळणार आहे. यासह जिल्हा उपनिबंधक, शिक्षण विभाग, जिल्हा पणन अशा महत्त्वपूर्ण विभागांचे दालन या ठिकाणी असून नागरिकांना थेट माहिती विचारून लाभ घेता येईल. या ठिकाणी आकर्षक असे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. मान्यवरांचे स्वागत दिव्यांग बालक आपल्या कलेचे प्रदर्शनाने करणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्यासाठी होणाऱ्या या विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधी विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





