Tuesday, April 21, 2026
spot_img

शहराच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध : आमदार संजय पुराम

देवरी नगरपंचायतीच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन : २१७ नागरिकांना पट्ट्यांचे तर ४०७ घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
देवरी, (गोंदिया) : देवरी शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जनतेला अधिक सुलभ आणि गतिमान सेवा मिळतील. देवरीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
देवरी येथील नगरपंचायतीच्या १० कोटी रुपये खर्चाच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पुराम यांच्या विशेष प्रयत्नातून या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजू उईके होते. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नवनाथ काथकडे, जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई वालोदे, पंचायत समिती सभापती अनिल बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रमोद संगीडवार, नगरपंचायत उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, मुख्याधिकारी करिष्मा वैद्य, ॲड. प्रशांत संगीडवार, छोटेलाल बिसेन, प्रवीण दहिकर, ओमप्रकाश रामटेके यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संजय पुराम पुढे म्हणाले की, “नागरिकांनी अशीच साथ दिल्यास येणाऱ्या ४ वर्षांत शहराच्या विकासासाठी अधिक मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच झुडपी जंगलातील प्रलंबित घरकुलांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल.” असे म्हटले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरातील २१७ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या पट्ट्यांचे (मालकी हक्क) वितरण करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४०७ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी धनादेशांचे वाटप करण्यात आले. हक्काचे घर आणि मालकी हक्क मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी प्रशासन जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष संजू उईके यांनी आगामी काळात शहरात विविध विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी नगरपंचायतीच्या विकासकामांचा आढावा सादर केला. संचालन शिंदे यांनी केले, तर आभार सचिन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला देवरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular