शिष्टमंडळाचे खा. प्रफुल पटेलांना निवेदन…
गोंदिया : जिल्ह्यातील चार तालुक्यांना नक्षलग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे या चारही तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त आहे. यामुळे संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने खासदार प्रफुल पटेल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हा पूर्णतः नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून २००५ पासून घोषित करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत अनेक शासकीय सोयी सुविधांचा लाभ येथील नागरिक व कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळत आहे. परंतु शासनातर्फे २७ जून २०२५ अन्वये गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा हे तालुके नक्षलग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहेत. पूर्ववत चारही तालुके नक्षलग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांची भेट घेवून निवेदन दिले. शासनस्तरावर योग्यरित्या पाठपुरावा करून जिल्हा नक्षलग्रस्त घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन खा. पटेलांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक समिती विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, उमेश रहांगडाल, शोभेलाल ठाकूर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष जीवन म्हशाखेत्री, सडक अर्जुनी उपनगराध्यक्ष वंदना डोंगरवार सोबत उपस्थित होते.





