मरार समाज कल्याण समितीची मागणी : पोलिस अधीकांना निवेदन
गोंदिया : तालुक्यातील रायपूर येथील 37 वर्षीय हनसलाल भंडारी पाचे याचा 2 सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. या हत्याकांडातील मुख्य आरोपींवर कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मरार समाज कल्याण समिती गोंदियाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन 23 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांना देण्यात आले.
तालुक्यातील रायपूर येथील हसनलाल भंडारी पाचे याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हसनलाल पाचे याचा मृतदेह सालईटोला ते रायपूर या मार्गावर आढळून आला. या घटनेची माहिती गावातील नागरिकांना व दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. याची माहिती घरच्या लोकांना मिळताच पाचे कुटुंबियांवर दुःखाचे आभाळ कोसळले. पोलिसांनी घटनेची नोंद करून गुन्हा दाखल केला आणि तपासकार्याला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी कपूरचंद उर्फ बंटी हरीशचंद्र ठाकरे व ओंकार चेतराम नेवारे या आरोपींना अटक केले. मात्र, या हत्याकांडातील मुख्य आरोपी याने मजुरीच्या पैशाच्या वादावरून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. या हत्याकांडातील मुख्य आरोपी कपूरचंद हरीशचंद्र ठाकरे याचावर कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मरार समाज कल्याण समिती गोंदियाच्या वतीने पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी, मृतकाची पत्नी मोतिकलाबाई पाचे, वडील भंडारी पाचे तसेच मरार समाज कल्याण समिती जिल्हाध्यक्ष आत्माराम पाचे, कार्याध्यक्ष विनायक खैरे, सचिव अमेश पाचे, महासचिव तरुण देशमुख, श्रावण खैरे, बी. एल. पंचेश्वर, डॉ. सुखदेव बिसेन, छगन नागफासे, सरपंच गायत्री पाचे तसेच समाजबांधव उपस्थित होते.





