गोंदिया : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 18 संचालक पदांसाठी रविवारी (ता. 29) मतदान घेण्यात आले. सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानप्रक्रियेत 38 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. एकूण 11 मतदान केंद्रांवरून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत एकूण 894 मतदार होते. त्यापैकी 868 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 97 इतकी आहे. ही निवडणूक शांततेत पार पडली. सेवा सहकारी गटात 100 टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत एकूण 20 संचालक आहेत. त्यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन तसेच प्रफुल्ल अग्रवाल यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यामुळे या निवडणुकीत रिंगणात असलेल्या 38 उमेदवारांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. यातून 18 संचालकांची बॅंकेवर निवड होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने (अजित पवार) सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. काॅंग्रेस व अन्य पक्षांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. ही निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. फुलचूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मतदान केंद्रावर खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, तिरोड्यात आमदार विजय रहागंडाले, अर्जुनी येथे आमदार राजकुमार बडोले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोमवारी होणार मतमोजणी…
३८ उमेदवारांचे भाग्य मतदारांनी मतपेटीत बंद केले असून, कोणाच्या गळ्यात संचालकपदाची माळ पडते, हे सोमवारी (ता. ३०) मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. मतमोजणी फुलचूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे.



